आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर सुरू असलेल्या परिवर्तन यात्रेचे आगमन अमरावती येथे ६ फेब्रुवारी रोजी होत आहे. यात्रेतील सहभागी मालटेकडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, चित्रा चौकात महात्मा जोतिबा फुले, इर्विन चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगेनगर येथे संत गाडगेबाबा या महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अभियंता भवन शेगाव नाका, येथे सामाजिक प्रबोधन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल संबोधित करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मनाली तायडे यांच्या हस्ते होणार आहे. विविध ओबीसी सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी मनोगत व्यक्त करतील. यात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, महाराष्ट्र सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन बोंडे, राज्य ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संजय मापले, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. श्रीराम कोल्हे, संविधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानाचे प्रा. प्रफुल्ल कडू, राज्य धोबी परिट महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेंद्रे, सुतार समाज समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आकोटकर, संभाजी ब्रिगेडचे शुभम शेरकर, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे विवेक कडू उपस्थित राहतील.
कार्यक्रमात प्रामुख्याने ओबीसींची जाती आधारित जनगणना, ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा, शेतकऱ्यांसाठी एमएसपी गॅरंटी कायदा, ओबीसींना ५२ टक्के आरक्षण, क्रीमिलेअरची अट रद्द करणे, पदोन्नतीत आरक्षण अशा विविध १९ मुद्यांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ओबीसी समाजातील जागृत समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व आयोजक सुनील डहाके व जिल्हा युनिटने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.