आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवस मेजवानी:बालकांमधील नाट्यगुण बहरले, ‘आम्ही नाटक करतो’ने झाला श्रीगणेशा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बाल रंगभूमी दिनाच्या शुभपर्वावर रविवार, २० मार्चपासून अमरावतीत बालनाट्य स्पर्धेचा प्रारंभ झाला. या स्पर्धेमुळे बालकांमधील नाट्यगुण अक्षरश: बहरुन आले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धा थांबल्या होत्या. ‘आम्ही नाटक करीत आहोत’ या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर दिवसभरात सहा नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे भरविण्यात आलेली ही विभागीय स्पर्धा येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सुरु आहे. आणखी दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन १७ व्या बाल नाट्य अंतिम स्पर्धेची रौप्यपदक विजेती पयोष्णी ठाकूर हिच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे होते. तर अतिथी म्हणून मायबाप अमरावतीकर रसिक उपस्थित होते.

साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, गजल ही अमरावतीची खास ओळख आहे. किंबाहूना कलाप्रेम हा अमरावतीकरांचा दागीणा असून कलासक्त नागरिकांच्या दृष्टीने अमरावती हेच विदर्भाचे माहेरघरही आहे. अॅड. देशपांडे यांनी अशा गौरवपूर्ण शब्दात यावेळी अंबानगरीची सांस्कृतिक ओळख करुन देत या शहराशी जुळलेल्या नाट्य चळवळीचा उल्लेख केला. यावेळी उद्घाटक पयोष्णी ठाकूर आणि इतर मान्यवरांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले. जागतिक बाल रंगभूमीदिनी ही स्पर्धा भरवण्यात आल्याने सर्व मान्यवरांनी बालकलावंतांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक स्पर्धेचे समन्वयक अॅड. चंद्रकांत डोरले यांनी केले.

नाट्य चळवळीचा ओझरता उल्लेख करीत अलिकडेच पार पडलेल्या साठाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या आयोजनात रसिकांनी दिलेली दाद दिलखुलास होती, याचा उल्लेखही त्यांनी केला. स्पर्धेदरम्यान उजगोबा, जैसा राजा तैसी प्रजा, आळशी राजू, बुलेट ट्रेन या नाटकांचे सादरीकरण झाले. उद्घाटन समारंभाला ‘जंगल बुक’ची थीम देण्यात आली होती. यावर्षी सुरु असलेली ही अठरावी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा आहे. या स्पर्धेत एकूण १६ बाल नाट्ये सादर होतील. अमरावती विभागातील वेगवेगळ्या संस्था ही नाटके सादर करणार असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच बाल कलाकार रंगमचावर आपली कला सादर करणार असून रसिकांची उपस्थिती आणि कौतुकाच्या टाळ्या या त्यांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवणार आहेत.

त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी आर्यन सहारे, अनमोल मेश्राम, नमन डोंगरे, समर्थ पाथरकर, सोहम श्रीखंडकर, निकुंज पांडे, यश वाकळे, भावार्थ सावळे, आरोही वडुरकर, ईश्वरी पारडे, आरोही पांडे, गार्गी डोरले, हर्षवर्धन सावरकर, आराध्या शिंगोरे, अक्षरा शिंदे, कार्तिक बाजड, जाई लावरे, देवांश सावरकर आदी बाल कलावंत, ज्येष्ठ रंगकर्मी विराग जाखड व सिरसाट, स्पर्धेचे सहसमन्वयक विशाल फाटे व अॅड. श्रद्धा पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आज पुन्हा सहा नाटकांचे केले जाणार सादरीकरण
उद्या, सोमवार, २१ मार्च हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. या दिवशी दुपारी साडे बारा वाजता स्पर्धेचा प्रारंभ होईल. डॉ. श्याम देशमुख लिखित ‘अनाथ’ या नाटकाने दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ होईल. त्यानंतर बुद्धाची गोष्ट, शिवाजी म्हणतो, खादाड आणि बुलेट ही नाटके सादर केली जातील.

बातम्या आणखी आहेत...