आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करेल तोच टिकेल:काम न करणाऱ्यांचा विचार करावा लागेल!, नवे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचा पदभार स्वीकारताच इशारा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''काम करेल तोच टिकेल. काम न करणाऱ्यांचा विचार करावा लागेल!'' असा इशारा नवे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पदभार स्वीकारताच आज दिला.

नवे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी बुधवारी (दि. 21) सकाळी मावळत्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याकडून पदभार स्विकारला, त्यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते.

पोलिस आयुक्त रेड्डी हे 1995 च्या तुकडीचे थेट डिवायएसपी आहेत. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी गडचिरोेली जिल्ह्यात पुर्ण झाला असून त्यांनतर त्यांनी चंद्रपूर व परभणी जिल्ह्यात सेवा दिली. त्यानंतर ते औरंगाबाद शहर येथे एसीपी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर औरंगाबाद येथेच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

2014 मध्ये बीड पोलिस अधिक्षक व नंतर औरंगाबाद ग्रामिण पोलिस अधिक्षक होते. त्यानंतर मुंबई पोलिस उपायुक्त तेथून पोलिस उपमहानिरीक्षक पदोन्नतीवर पुणे एसआरपीएफ व तेथून नागपूर येथे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून मागील सव्वा दोन वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी अमरावती पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला आहे. रेड्डी यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर पोलीस उपायुक्त सागर पाटील व पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्याकडून आयुक्तालयाचा प्राथमिक आढावा घेतला.

ते म्हणाले, शहर व ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव वेग वेगळा असतो. मालमत्ताविषयक, महिला व बालकांवरील गुन्हे नियंत्रित ठेवण्यावर आपला भर असेल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात जातीय तणाव नसावा, त्यासाठी प्राधान्यक्रमाने काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोका, एमपीडीएचा गरजेनूसार वापर केला जाणार आहे.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी ठाणेनिहाय ‘टॉप 20’ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले.

अलिकडे नशा करण्यासाठी काहींकडून त्यामध्ये तरुणांचा समावेश अधिक एमडी किंवा अन्य ड्रग्जचा वापर केला जातो. मात्र अनेक जण पैश्याअभावी स्वस्तातल्या नशेकडे वळला आहे. अशावेळी मेडिकलमधून विशिष्ट ड्रग्ज घेऊन त्याची नशा केली जाते. त्यामुळे मेडिकलधारकांनी नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय विकू नये, यासंदर्भात आम्ही लवकरच ड्रग्ज ऑथर्टीसोबत चर्चा करणार असल्याचे सीपी रेड्डी यांनी सांगितले. तसेच अलीकडे सायबर क्राईम हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सायबर क्राईम रोखण्यासाठी नागरीकांनी अधिक अलर्ट असायला पाहीजे, सेक्सटॉर्शनचे प्रकार अलीकडे समोर येत आहेत, त्यामुळे नागरीकांनी स्वत:ची फसवणूक होणार अशा पध्दतीने समाजमाध्यमांचा वापर करावा, तसेच काही समस्या व तक्रार असल्यास तत्काळ पोलिसांसोबत निसंकोचपणे संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...