आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार नवणीत राणांविरोधात एनसी दाखल:तरुणाच्या वडिलांनी दिली राजापेठ पोलिसात तक्रार; धमकी अन् बदनामी प्रकरणी गुन्हा

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी बेपत्ता झाली होती. या तरुणीला शहरातीलच एका तरुणाने पळवून नेले, असा आरोप खासदार नवनित राणा यांनी केला होता. या प्रकारामुळे आमची बदनामी झाली आहे, तसेच माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभित झाला आहे, अशी तक्रार त्या मुलाच्या वडीलांनी राजापेठ पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी खासदार राणा यांच्याविरुध्द शनिवारी (दि. 10) उशिरा रात्री अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहे.

रुक्मिनीनगर भागातील तरुणी 5 सप्टेंबरला दुपारपासून घरुन बेपत्ता झाली होती. दरम्यान या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि खासदार नवनित राणा यांनी 6 सप्टेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठले. बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे, त्याला सर्व माहीत आहेे, मात्र तो पोलिसांना माहीती देत नाही, पोलिस त्याच्याकडून मुलीची माहिती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करुन खासदार राणा यांनी पोलिसांवर चांगले तोंडसुख घेतले होते. तसेच राजापेठ ठाणेदार मनिष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला, असा आरोपसुध्दा यावेळी खासदार राणा यांनी केला होता. या प्रकारावरुन राजापेठ ठाण्यात वातावरण चांगलेच तापले होते. पोलिस व खासदार राणा आमनेसामने आले होते.

दरम्यान त्यानंतर 24 तासातच मुलीचा पत्ता लागला, ती साताऱ्यात सापडली आणि एकटी होती. आपल्याला कोणीही पळवून नेले नाही. मला कोर्स असायचा असल्यामुळे मी स्वत: आले होते, असे तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान खासदार राणा यांनी मुलासोबतच आमची बदनामी केली, तसेच माझ्या मुलाला पाहून घेवू, अशी धमकी दिली आहे. या प्रकारामुळे तो भयभीत झाला आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे राजापेठ पोलिसांनी धमकी देणे, बदनामी करणे अशा कलमान्वये खासदार नवनित राणा यांच्याविरुध्द ‘एनसी’ची नोंद केली आहे.

एनसी दाखल

राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनिष ठाकरे म्हणाले की, या प्रकरणी तरुणाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन खासदार नवनित राणा यांच्याविरुध्द एनसी नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...