आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाई, बेकारी व उद्योग पळविण्याच्या सध्याच्या घडामोडी हे विद्यमान राज्य सरकारचे अपयश आहे, असे सांगत यावर प्रहार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे येत्या 19 डिसेंबरला विधीमंडळाच्या नागपुर अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी टोपे आज, सोमवारी अमरावती येथे आले होते. जिल्ह्याचे समन्वयक म्हणून पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले टोपे?
ते म्हणाले, सध्या बेकारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शिक्षण पूर्ण करुन सज्ज असलेल्या पिढीला रोजगार नाही. रोजगार निर्मितीची क्षमता असलेले उद्योग केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर गुजरातेत पळविले जात आहेत. राज्यात कधी नव्हे एवढे मोेठे नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना झेलावे लागले. परंतु शासनाने घोषित केलेली प्रोत्साहन रक्कम अद्याप त्यांना मिळाली नाही.
आंदोलनात यांचा असणार सहभाग
विम्याची रक्कम मागायला गेले तर तिही त्यांना मिळत नाही. या दु:खात अधिक भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सर्रास कापले जात आहे. परंतु सरकार म्हणून राज्यकर्त्यांना त्याकडे बघायला वेळ नाही. एकंदरीत युवक व शेतकरी दोघांनाही वाऱ्यावर सोडल्यागत सरकारची सध्याची भूमिका आहे. या सर्व मुद्द्यांना धरुनच 19 ला विधीमंडळावर मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चाच्या मागण्या स्पष्ट करताना टोपे यांनी विदर्भाच्या अनुशेषाचा मुद्दाही समोर केला. कोणत्याही प्रदेशात अनुशेष राहूच नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची कायम भूमिका असून तो दूर करण्यासाठीचे प्रयत्न फार पूर्वीपासूनच सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी आंदोलनात उद्योग, सिंचन, शिक्षण आदी क्षेत्रातील अनुशेषाचा मुद्दाही समाविष्ट असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी शहराध्यक्ष डॉ. गणेश खारकर, चांदूर रेल्वेचे माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालय व्हायलाच हवे
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असावे, असे केंद्र शासनाचे धोरण आहे. काही ठिकाणी सरकारी तर काही ठिकाणी पीपीपी मॉडेलनुसार ते पूर्णत्वास जाणार आहे. दरम्यान अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावर आम्ही सत्तेत असतानापासूनच सहमत आहोत. सध्याच्या सरकारने त्या मुद्द्याला तडीस नेले पाहिजे, एवढेच मला सांगता येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.