आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना 'मान' ना 'धन':78 प्रकारची कामे करवून घेता, तुटपुंजे वेतन देता ? संतप्त आशा कर्मचारी उभारणार तीव्र लढा

अमरावती2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य क्षेत्रात कार्यरत आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांकडून विविध 78 प्रकारची कामे करवून घेतली जातात. परंतु त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. त्यांनी आतापर्यंत दिल्ली, मुंबई, नागपूर व जिल्हा पातळीवर अनेक आंदोलन केली. परंतु मानधनात किरकोळ वाढ करून सरकार आमची थट्टा तर करत नाहीयेना असा प्रश्न आशा कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘आयटक’ च्या नेतृत्वातील आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनेचे जिल्हा अधिवेशन येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात घेण्यात आले. यावेळी हा निर्णय एकमताने पारित करण्यात आला. आयटकचे स्थानिक नेते कॉ. जे. एम. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू देसले, आयटकचे श्याम काळे, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे आदी मान्यवर या अधिवेशनाला प्रामुख्याने उपस्थित होते.

4 महिने करावी लागते प्रतिक्षा

यावेळी देसले म्हणाले, प्रचंड वाढलेल्या महागाईत तुटपुंज्या मानधनावर कुटुंब कसे चालवायचे, असा बिकट प्रश्न आशा व गटप्रवर्तकांपुढे उभा ठाकला आहे. आरोग्य विभागाने संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. परंतु त्यांना ना मान दिला जातो ना योग्य मानधन. किरकोळ मानधनासाठीही त्यांना चार-चार महिने थांबावे लागते.

आंदोलनाची तयारी ठेवा

केंद्र सरकारने 2018 पासून आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ केलेली नाही. घरगुती गॅसची दरवाढ झाली. अन्न-धान्यासह रोजच्या जीवनातील वस्तूंवर जीएसटी आकारला गेला. इतरही वस्तूंचे भाव रोजच वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात तीव्र आंदोलनाची तयारी ठेवा, असे आ‌वाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

सरकारला सत्तेतून पायउतार करा

यावेळी बोलताना कॉ. तुकाराम भस्मे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने कामगारविरोधी कायदे तयार केले आहेत. कामगारांनी लढा उभारुन मिळवलेले कायदे या सरकारने बदलले. त्यामुळे या सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन करतानाच त्यासाठी कामगारांची एकजूट ठेवण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी श्याम काळे व जे. एम. कोठारी यांनीही आपली मते मांडली. प्रारंभी आशा वर्करचे प्रश्न रेखा मोहोड तर गटप्रवर्तकांचे प्रश्न मंगला बावनेर यांनी मांडले. संचालन प्रियंका धस्कट यांनी केले तर आभार उज्ज्वला चौधरी यांनी मानले.

जिल्हाध्यक्षपदी रेखा मोहोड

अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार जिल्हाध्यक्षपदी रेखा मोहोड यांची निवड झाली असून सचिव पदाची जबाबदारी पुन्हा एकदा प्र‌‌फुल्ल देशमुख यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...