आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांचा कौल / रवींद्र लाखोडे:कुणालाही स्पष्ट कौल नाही, काँग्रेसची संथ गती मात्र कायम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचे एक-चतुर्थांश भौगोलिक क्षेत्र व्यापणारी ही निवडणूक असली तरी ती सर्व चौदाही तालुक्यात असल्यामुळे अख्ख्या जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले होते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हा रणसंग्राम सुरु होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था, बाजार समित्यांच्या निवडणुकाही थांबविल्या होत्या. यावरुन सत्ताधाऱ्यांचे या निवडणुकीकडे किती बारीक लक्ष होते, हे स्पष्ट होते. परंतु तरीही सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत लक्षवेधी यश मिळवता आले नाही.

जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची, यावरुन जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे एकूण राजकीय चित्र स्पष्ट होते. परंपरेने येथील जिल्हा परिषद नेहमी काँग्रेसच्या बाजूने उभी राहिली आहे. प्रशासक काळ सुरु होण्यापूर्वी खुद्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हेच अध्यक्ष होते. त्याचवेळी काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर पालकमंत्री होत्या. चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आणि दर्यापुर-अंजनगाव सुर्जीचे आमदार बळवंतराव वानखडे हे नेहमी त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. या सर्वांमुळे काँग्रेसने जिल्ह्याच्या चारही कोपऱ्यात े वर्चस्व कायम ठेवले आहे. १४१ सरपंच जिंकल्याचा त्यांनी केलेला लेखी दावा हा त्यामुळेच महत्वाचा ठरत असून हे वर्चस्व निकालातून प्रतिबिंबीत झाले, असे म्हणायला हरकत नाही.

भाजपने १२० जागांचा दावा केला असला तरी तो किती खरा आहे, हे जोपर्यंत त्यांच्याकडून यादी प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्या संख्येभोवतीचा संशयकल्लोळ कायम राहणार आहे. त्याचवेळी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही (शिंदे गट) चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. या दोन्ही पक्षांचे दावे एकत्र केले तर एकूण संख्या १५५ च्या पुढे सरकत नाही. मध्यंतरी माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ या पिता-पुत्राच्या माध्यमातून शिंदे गटाने येथे पाय रोवण्याचा प्रयत्न चालवला जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट आणि अरुण पडोळे यांनी कर्मचारी व लोकांची काही प्रतिनिधी मंडळे थेट मुख्यमंत्र्यापर्यंत नेऊन थोडेफार शासनादेशही पदरात पाडून घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु तरीही त्याचे प्रतिबिंब निकालात दिसून आले नाही.

चिखलदरा तालुक्यातील २६ आणि धारणी तालुक्यातील २३ अशा ४९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. परंतु त्यात काँग्रेसनेच मुसंडी मारली, असा त्या पक्षाचा दावा आहे. एकंदरीत या निवडणुकीचा नेमका बोध काय तर ना सत्तांतराचा परिणाम ना सत्ताधाऱ्यांची पकड असाच आहे. याउलट काँग्रेसचा संथ प्रवाह यापुढेही असाच कायम राहील, असा अंदाज आहे. येत्या जिल्हा परिषद व त्यानंतरच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी दिसून येईलच.

भाजपला ‘ती’ घनिष्ठता भेदता आली नाही कदाचित बच्चू कडू आणि रवी राणा यांच्याशी असलेली पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घनिष्टता भाजपला थेट भेदता आली नसावी म्हणून ना त्यांना फायदा ना आपल्याला लाभ, अशी स्थिती झाली असावी, असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. एरवी मेळघाट आमचाच असे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा नेहमीच सांगतात. परंतु तेथील आदिवासीबहुल क्षेत्रात त्यांचाही फारसा वकूब दिसून आला नाही.

बातम्या आणखी आहेत...