आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या वेळी मंचावर पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र त्यांना भाषण करण्यासाठी ‘पीएमओ’ने परवानगी नाकारली. ही बाब अतिशय धक्कादायक असून हा संपूर्ण राज्याचा अपमान असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. अमरावतीत पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पुण्याजवळील देहू येथे कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. ही बाब अतिशय वेदनादायी व राज्याचा अपमान करणारी आहे, असे सुळे म्हणाल्या. देहू येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधानांचा मुंबईत कार्यक्रम होता. प्रोटोकॉलनुसार मुंबईतील कार्यक्रमासाठीही अजित पवार यांना उपस्थित राहणे आवश्यक होते. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांचे विमान उतरण्यापूर्वी अर्धा तास व अर्धा तास नंतर इतर कोणाचेही विमान उतरू शकत नाही. त्यामुळे अजित पवार हे पंतप्रधान ताफ्यातील क्रमांक दोनच्या चॉपरने मुंबईसाठी रवाना झाले, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय खोडके, सलील देशमुख, सुनील वऱ्हाडे, सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते.
देशमुख फॅमिलीकडे १०९ वेळा धाड हा ‘विश्वविक्रम’
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांच्याविरुद्ध कोणतीही केस नाही तरीही ते तुरुंगात आहेत. देशमुख फॅमिलीकडे आतापर्यंत ईडी, सीबीआय व आयकर अशा तीन विभागांनी वेगवेगळ्या १०९ धाडी टाकल्या आहेत. १०८ धाडीत त्यांच्याकडे काहीच सापडले नाही म्हणून १०९ व्यांदा धाड टाकली. देशमुख यांना खांद्याचे दुखणे आहे, मात्र तरीही त्यांना दिलासा नाही, हा अन्याय आहे. तसेच नवाब मलिक यांच्याविरुद्धही कोणताही ठोस गुन्हा नाही, त्यांनाही अटक केली आहे. केंद्राच्या विरोधात बोलणाऱ्याविरुद्ध ईडीची कारवाई होते, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.