आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:13 पोलिसांना वेतनवाढ रोखण्याची दिली नोटीस ; दंगलसदृश स्थितीतही कर्तव्यावर न येणे भोवले

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर शहरात १७ मे रोजी दुल्हागेट परिसरात दोन गटात झेंडा लावण्या वरुन वाद झाला होता. यावेळी अचलपूर शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. असे असूनही अचलपूर ठाण्यातील १३ अंमलदार असे होते की, त्यांना या गंभीर घटनेची माहिती मिळून व कर्तव्यावर बोलावूनही तत्काळ ते हजर झाले नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्ष वेतनवाढ रोखण्यासंदर्भात नोटीस बजावल्या आहेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळावी लागते. बहुतांश पोलिस अधिकारी, कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर जातातच. असे असले तरी अचलपुरात १७ मे रोजी झालेल्या घटनेनंतर अचलपूर ठाण्याच्या आस्थापनेवरील सर्व पोलिसांना तत्काळ कर्तव्यावर हजर होण्याबाबत माहिती देण्यात आली होती. कारण परिस्थिती चिघळली होती. संचारबंदी लागू करण्यात आली होती. यावेळी अचलपूर ठाण्यासोबतच परतवाडा, आसेगाव, अंजनगाव व इतरही ठाण्यातून कुमक बोलावली होती. आजूबाजूच्या ठाण्याचे पोलिस अचलपुरात दाखल झाले. मात्र, अचलपूर ठाण्यातील १३ अंमलदार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्यांना दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस दिलेल्या आहेत. अचलपूर ठाण्या व्यतिरिक्त अन्य एका ठाण्यातील चार ते पाच पोलिस सुद्धा हजर झाले नव्हते, त्यांच्यावरही लवकरच याप्रकारची कारवाई होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...