आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च महिना संपायला केवळ एकच आठवडा उरला असताना शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल ५ कोटी ७२ लाख ८१ हजार ६५० रुपयांचा कर थकीत आहे. या कराच्या वसुलीसाठी न.प. प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस पाठवल्या असून, प्रसंगी अप्रिय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहे.
शहरातील मालमत्ताधारकांकडे चालू आर्थिक वर्षात ७ कोटी २३ लाख ४३ हजार ३०३ रुपयांची कर थकबाकी होती. यापैकी १ कोटी ८५ लाख रुपये वसुल झाले असून अद्याप पावणेसहा कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. त्यासाठी वसुली अभियान कडक करण्यात आले असून, गेल्या १ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या वसुली अभियानासाठी नगरपालिका प्रशासनाने एकूण १० प्रभागात प्रत्येकी २ कर्मचारी नियुक्त केले असून, संबंधित मालमत्ता धारकांकडील थकीत व चालू कराची वसुली सुरु आहे. दरम्यान, मोठे थकबाकी दार मालमत्ता धारकांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. ज्यांंच्याकडे मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत आहे. त्यांच्या वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, २०० च्यावर मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसही बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालिका प्रशासन आणी थकबाकीदारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका क्षेत्रातील सर्वच घटकातील मालमत्ताधारकांकडे पाणीपट्टी, मालमत्ता कर तसेच इतर करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तरीसुद्धा थकबाकी दार कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शहरातील विविध विकास कामांत अडचणी येत आहेत. मार्च एंडीगच्या तोंडावर नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शंभर टक्के कर वसुलीचे निर्देश नगर विकास मंत्रालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली असून, कर्मचारी थकीत मालमत्ताधारकांकडे जाऊन कराची वसुली करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे थकीत मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असून, खळबळ उडाली आहे. न.प. प्रशासनाच्या मते शहरातील मालमत्ताधारकांकडून अद्याप ५ कोटी ७२ लाख ८१ हजार ६५० रुपये वसुल करणे बाकी आहे. दरम्यान, नोटीस नंतरही कराचा भरणा न करणाऱ्यांवर गेल्या २१ मार्चपासून जप्तीची कारवाईदेखील सुरु करण्यात आली आहे.
कर वसुली करताना टप्पे पाडून द्यावे : नगरपालिका क्षेत्रात विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकाने मालमत्ता कर भरणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कर वसुली करताना टप्पे पाडून द्यावे. तसे केल्यास करही वसुल होईल आणि जप्तीचे आदेश बजावल्यामुळे होणारा ताणतणावही टाळता येईल, असे , दर्यापूर येथील प्रा. डॉ. अरुण चांदूरकर यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.
…तर प्रतिष्ठाने सील करु
कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थकीत रक्कम वसुल करण्यात येत आहे. नागरिकांनी जप्तीची अप्रीय कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडील मालमत्ता कराचा भरणा वेळेच्या आत करावा. कराचा भरणा न केल्यास संबधितांच्या प्रतिष्ठानांचा लिलाव किंवा सील लावण्याची कारवाई करण्यात येईल.
पराग वानखडे, मुख्याधिकारी न.प. दर्यापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.