आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नुटा’ ची यावेळीही राखली सत्ता:अध्यक्ष पराभूत झाल्याने शिक्षण मंचला मोठा हादरा, 42 पैकी 37 निकाल घोषित

अमरावती6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विद्यापीठाच्या अधीसभा, विद्वत परिषद व अभ्यासमंडळाची मतमोजणी 36 तास उलटूनही सुरुच आहे. दरम्यान अधीसभा व विद्वत परिषदेचे 42 पैकी 37 निकाल हाती आले असून त्यामध्ये माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या नेतृत्वातील नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशनने (नुटा) जोरदार मुसंडी मारत 25 जागा जिंकल्या आहेत.

प्रा. प्रदीप खेडकर स्वत:च पराभूत झाल्याने शिक्षण मंचला जबर हादरा बसला आहे. या पॅनलला सध्या 7 जागांवर विजय मिळाला असून एका अपक्षानेही सिनेटमध्ये जागा पक्की केली आहे.

अभ्यास मंडळासह विद्यापीठाच्या दोन्ही प्राधिकारिणींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ती अद्यापही सुरुच आहे. नुटाला मिळालेल्या 25 जागांमध्ये 8 प्राध्यापक, 7 प्राचार्य, शिक्षण संस्थांचे 4 संचालक आणि 3 विद्यापीठ शिक्षकांचा समावेश आहे. त्याचवेळी शिक्षण मंचने आपल्या खात्यात प्रत्येकी दोन प्राचार्य, नोंदणीकृत पदवीधर व शिक्षण संस्थांचे संचालक मिळवले आहेत.

विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापकांच्या संवर्गातही मंचने एक जागा जिंकली असून याच संवर्गातील प्रा. संतोष बनसोड हे अपक्ष म्हणून विजयी झाले. नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदारसंघाचे दहापैकी केवळ पाच निकाल घोषित झाले असून उर्वरित पाच जागांची मतमोजणी अद्याप सुरु आहे. विजयी पाच जणांमध्ये नुटाचे तीन आणि शिक्षण मंचच्या दोघांचा समावेश आहे.

यशस्वी झालात, पण..

सिनेट आणि अ‌ॅकडेमीक या दोन्ही प्राधिकारिणीच्या भरपूर जागा जिंकत ‘नुटा’ने एवढे मोठे यश मिळाल्यामुळे विद्यार्थी केंद्रीत मुद्द्यांना बळ देत ‘नुटा’चे यश प्राध्यापकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी उपयोगी पडावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे यशस्वी झालात, परंतु पुढेही यशस्वीच आहात, अशी कृती व्हावी, ही प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा गैर नाही.

गेल्यावेळीसुद्धा ‘नुटा’ला जवळपास 70 टक्के जागा मिळाल्या होत्या. परंतु कुलपती आणि कुलगुरुंनी नामित केलेल्या सदस्यांमुळे बहुमत असूनही काही मुद्द्यांवर ‘नुटा’ला विद्यार्थीहिताचे निर्णय घेता आले नाहीत. कोरोना काळातील परीक्षेचा ऑनलाईन-ऑफलाइनचा मुद्दा असो किंवा परीक्षा विद्यापीठाने घ्यावी की महाविद्यालयाने याबाबत ‘नुटा’ने भूमिका घेतली खरी. परंतु त्या भूमिकेला अनुसरुन निर्णय घेण्यास विद्यापीठ प्रशासनाला ते बाध्य करु शकले नाहीत.

विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृहाचा मुद्दा, जिल्हा स्तरावर विद्यापीठाची मदत केंद्रे स्थापन करण्याची बाब, ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना हवा असलेला ‘गेट वे’, संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षण-संसोधन-खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी व्हावयाचे प्रयत्न, ‘नॅक’मध्ये विद्यापीठाची किंमत वाढविण्यासाठी करावी लागणारी कसरत अशा अनेक मुद्द्यांवर ‘नुटा’ ला काम करण्यासाठी वाव आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

बातम्या आणखी आहेत...