आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा राणांविरोधात हल्लाबोल:खासदार नवनीत राणा यांना पडला जबाबदारीचा विसर; अमरावती जिल्हा प्रमुखांची टीका

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार म्हणून जनतेने सोपविलेल्या जबाबदाऱ्यांचा नवनीत राणा यांना विसर पडल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बूब आणि नागपूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा माजी जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी लावला आहे.

अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या महत्वाच्या मुद्द्यांवर बूब आणि सूर्यवंशी यांनी आज, शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. मेळघाटातील नॅरोगेज रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत करणे, शकुंतला रेल्वेचे पुनरुज्जीवन, नांदगाव पेठच्या पंचतारांकीत एमआयडीसीमध्ये उद्योगाचे जाळे, मेळघाटातील स्कायवॉक, अचलपुरची फिनले मिल, भारत डायनॅमिक कारखाना सुरु करणे आदी मुद्दे केंद्र शासनाशी निगडित आहेत. परंतु या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी अद्याप त्यांचे लक्ष केंद्रीत केले नाही. किंबहूना त्यांना या मुद्द्यांचा विसर पडला, असे बूब आणि सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे.

त्यांच्यामते ज्या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा यांनी संसदेत बोलायला हवे होते, तो मेळघाटमधील रेल्वेमार्ग रुंदीकरणाचा मुद्दा प्रतापराव जाधव यांनी संसदेत मांडला. स्कायवॉकच्या मुद्द्यावर केवळ चर्चाच झाली, प्रत्यक्ष काम अद्याप सुरु झाले नाही. शकुंतला रेल्वे ही पुन्हा सुरु व्हावी, यासाठी दर्यापूर-अंजनगाव सुर्जीच्या नागरिकांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. परंतु ब्रिटीशकाळातील वारसा असलेल्या या रेल्वेच्या मुद्द्यावर खा. राणा अद्याप बोलल्या नाहीत. फिनले मिलचा मुद्दा राष्ट्रीय वस्त्रोद्दोग महामंडळाशी संबंधित असतानाही तेथील मजूर आणि कर्मचाऱ्यांबाबत खासदारांनी योग्य ती भूमिका घेतली नाही.

जुन्या कामांना प्राधान्य - खा. राणा

सदर पत्रकार परिषदेनंतर ‘दिव्य मराठी’ने खासदार नवनीत राणा यांचीही बाजू जाणून घेतली. त्या म्हणाल्या, देशभरातील इतर खासदारांप्रमाणे माझेही दोन वर्षे कोरोनातच गेले. त्यानंतर सुरु झालेल्या कामकाजात मी कोठेही कमी पडले नाही. माझ्या परीने सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. जी जुनी कामे मंजूर होऊन रखडली आहेत, त्याकडे मी प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय इतर मुद्द्यांवरही माझा पाठपुरावा सुरुच आहे. भारत डायनॅमिक लिमीटेडबद्दल (बीडीडीएल) मी संरक्षण मंत्र्यांसोबतच पंतप्रधानांनाही पत्र लिहिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बडनेरचा रेल्वे वॅगन कारखाना येत्या तीन-चार महिन्यात सुरु होईल, एवढे ते काम पुढे गेले आहे. बेलोरा विमानतळाचे प्रलंबीत कामही सुरु झाले आहे. फिनले मिल व रेल्वेचे प्रश्न याबाबत त्या-त्या खात्याच्या मंत्र्यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. याऊलट केंद्राकडून हिरवी झेंडी मिळविल्यानंतरही राज्य शासनाच्या असहकारामुळे काही कामे रखडली आहेत. विशेषत: मेळघाटमधील मुद्द्यांवर राज्य सरकार सकारात्मक नाही, असे माझे निरीक्षण आहे. ठाकरे सरकार त्यात अडथळा आणते आहे, हे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी तपासून बघावे.

—-----------------------------------------

बातम्या आणखी आहेत...