आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोन:ऑनलाइन लोन फ्रॉडच्या तारा थेट नेपाळच्या सीमेला भिडल्या; व्याजाची रक्कम चुकवूनही अधिकच्या रकमेची मागणी

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन कर्ज देण्याचे आमीष देवून किंवा प्रत्यक्ष कर्ज देवून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत. दिलेल्या कर्जाव्यक्तिरिक्त व्याजाची रक्कम चुकवूनही अधिकच्या रकमेची मागणी करतात. मागणीप्रमाणे पैसे न दिल्यास संबंधित कर्जदाराच्या परिचितांना मेसेज पाठवून, मॉर्फ केलेले छायाचित्र पाठवून बदनामी करतात. या प्रकरणी आलेल्या तक्रारींची सायबर पोलिसांनी तांत्रिकरित्या चौकशी केली. आजवर सायबर गुन्हेगार देशाच्या विविध राज्यातून हे गुन्हे करत होते मात्र लोन फ्रॉडमधील गुन्हेगार हे गुन्हा करण्यासाठी थेट नेपाळचे नेटवर्क वापरत आहे, ते नेपाळमध्ये जावून किंवा नेपाळ व भारताच्या सीमेवरून गुन्हे करत असावेत, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

ऑनलाइन कर्ज देण्यासाठी मागील काही दिवसांपासून विविध अॅप्लिकेशनच्या माध्यमातून १ ते २० हजार रुपयांपर्यंत अल्प मुदतीचे कर्जाची गरज असलेली व्यक्ती त्या अॅपवर त्याचे आधार कार्ड, पॅनकार्ड, स्वत:चे पासपोर्ट छायाचित्र, बँक खात्याची माहिती देतात. दरम्यान, त्या व्यक्तीला कर्ज दिले जाते. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावरुन व्हॉइस कॉलद्वारे कर्जदार व्यक्तीकडून आणखी रक्कम मागितली जाते. त्याने नकार दिला तर त्याला बदनाम करण्याची धमकी दिली जाते. तरीही त्याने ऐकले नाही तर कर्जदाराच्या परिचित व्यक्तींना कर्जदाराबाबत अश्लील आक्षेपार्ह मेसेज पाठवून बदनामी केली जाते. असे प्रकार जिल्ह्यात गत पाच ते सहा महिन्यात अनेक घडले आहेत मात्र, बदनामीपोटी अनेकांनी समोर न येता पोलिसांत तक्रार केली नाही. मात्र, ग्रामीण पोलिसांकडे तीन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या तक्रारीच्या तपासात पोलिसांना लोन फ्रॉडमधील गुन्हेगार वापरत असलेले नेटवर्क हे नेपाळचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ
सायबर गुन्ह्यात देशांतर्गत आरोपी यापूर्वी पकडले आहेत. मात्र, देशाबाहेर असलेल्या आरोपींना पकडायचे असल्यास केंद्रीय गृहमंत्रालय, इंटरपोल अशी प्रक्रिया पार करावी लागते. आतापर्यंत सायबर गुन्ह्यात विदेशातील आरोपी आम्ही पकडलेले नाहीत. मात्र, आगामी काळात वरिष्ठांच्या सूचनेनुसार, अशा प्रकरणात निर्णय घेता येतील. -अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक.

तक्रारी आणि चौकशीनंतर तीन महिन्यात ४३ लोन ॲप बंद
ग्रामीण सायबर पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत ‘प्ले स्टोअर’वरील ज्या लोन अॅपचा वापर झाल्याचे लक्षात आले, असे ४३ अॅप प्ले स्टोअरच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करुन बंद करण्यास सांगितले होते. ते त्यांनी बंद केले आहेत. तसेच चौकशीमध्ये लोन फ्रॉडमधील गुन्हेगार नेपाळचे नेटवर्क वापरत असल्याचे समोर आले आहे. ते गुन्हेगार भारत-नेपाळच्या सीमेवर किंवा नेपाळमध्ये जाऊन नेटवर्क वापरत असावे, असे ग्रामीण सायबर ठाण्याचे एपीआय ईश्वर वर्गे यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यात न अडकण्यासाठी ऑनलाइन कर्ज घेणे कटाक्षाने टाळावे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...