आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संकटात:चांदुर बाजारमध्ये संत्र्यावर डायबाग रोगाचे अतिक्रमण, बागांमध्ये फळगळ; लाखोंच्या खर्चामुळे बळीराजा चिंतेत

अमरावती | रविंद्र लोखंडे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदुर बाजार तालुक्यातील संत्रा फळबागांमध्ये होत असलेल्या फळगळमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करुनसुध्दा उत्पादन होणार की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

फवारणीचाही परिणाम नाही

गेल्या 15 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संत्र्यावर डायबाग या रोगाने आक्रमण केले आहे. या रोगामुळे संत्राफ‌ळ डागाळले जात असून फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी या परिसरातील संत्राबागा खराब होत आहे. यावर शेतकरी फवारणी करुन मोठ्या प्रमाणात खर्च करित आहेत. तरीसुद्धा फवारणीचा काही फायदा होताना दिसत नाही.

तज्ज्ञ खुर्चीतच बसून

नागपूर येथे संत्रा संशोधन केंद्र आहे. मात्र त्या ठिकाणच्या चमू कधीही थेट शेतात येऊन पाहणी करित नाहीत. तेथील तज्ज्ञ कधी मार्गदर्शनही करित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नागपूर येथील एनआरसी केंद्राबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत्रा फळबागांवर आलेल्या रोगाचे निदान लागत नसल्याने यावर्षी माधान येथील पंकज आवारे या शेतकऱ्यांने आपली संत्रा बागच नष्ट केली.

शासनाने मदत करावी

माधान येथील शेतकरी उपेंद्र मोहोर यांनी सांगितले की, संत्र्यावर आतापर्यत 3 लाख खर्च केले. आता पैसे मिळणार किंवा नाही, हे सांगता येत नाही. शेतीसाठी कर्ज काढून खर्च केला. मात्र आता उत्पादन होणार की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना तत्काळ शासनातर्फे मदत देण्यात यावी.

नोटबंदीपासून दुष्टचक्र

शेतकरी राम मोहोड यांनी सांगितले की, नोटबंदीपासून हे दुष्टचक्र सुरु आहे. त्यावर्षीपासून दरवर्षी मोठा खर्च होतो. परंतु संत्रा फळबागेला लावलेले पैसेदेखील निघत नाही. शेती तोट्यात जात आहे. वेगवेगळ्या रोगांबरोबर कृत्रिम संकटेही काही कमी होत नाही. त्यामुळे शेती करावी कशी, हा प्रश्न झाला आहे.

निवडणूक आली तर आठवतो शेतकरी

देऊरवाडा येथील शेतकरी सागर केदार यांनी सांगितले की, आधी संत्राला चांगली फूट दिसली. मात्र शेवटी किती संत्रा झाडावर राहणार, हाच गंभीर प्रश्न आहे. सतत होत असलेल्या आर्थिक नुकसानामुळे कर्ज काढून शेती करावी लागत आहे. त्यात निवडणूक आली की शेतकरी आठवतो मग शेतकरी कोठे जातो.

शासनाने उपाययोजना आखाव्या

जसापूर येथील शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, शेतकरी यांच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. कृषी विभाग आणि एनआरसी यांच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी यांना मोठा फटका बसत आहे. लाखो रुपये पगारासाठी खर्च होतात. मात्र जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही. यासाठी राज्य सरकारने उपाययोजना आखाव्यात.

बातम्या आणखी आहेत...