आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिपावसाचा परिणाम:फळगळती, इतर रोगांमुळे चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा उत्पादक संकटात

चांदूर बाजार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील संत्राफळबागांमध्ये होत असलेल्या फळगळमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा उत्पादन होणार की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पंधरा दिवसामध्येच संत्र्यावर डायबाग या रोगाने आक्रमण केले आहे. या रोगामुळे संत्राफ‌ळ डागाळले जात असून, फळांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी या परिसरातील संत्राबागा खराब होत आहे. यावर शेतकरी फवारणी करुन मोठ्या प्रमाणात खर्च करित आहेत. पण तरीसुद्धा फवारणीचा काही फायदा होताना दिसत नाही.

नागपूर येथे संत्रा संशोधन केंद्र आहे. मात्र त्या ठिकाणच्या चमू कधीही थेट शेतात येऊन पाहणी करित नाहीत. तेथील तज्ज्ञ कधी मार्गदर्शनही करित नाहीत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नागपूर येथील एनआरसी केंद्राबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत्रा फळबागांवर आलेल्या रोगाचे निदान लागत नसल्याने यावर्षी माधान येथील पंकज आवारे या शेतकऱ्यांने आपली संत्रा बागच नष्ट केली. कारण लागवडीसाठी येणारा खर्चही निघत नसल्याने कीडलेली बाग ठेवून काय उपयोग?, असा विचार करत आपण रोगामुळे संत्रागळती झालेल्या बागाच नष्ट केल्याचे चांदूरबाजार तालुुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

शासनातर्फे शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जावी
संत्र्यावर आतापर्यत ३ लाख खर्च केले. आता पैसे मिळणार किंवा नाही, हे सांगता येत नाही. शेतीसाठी कर्ज काढून खर्च केला. मात्र आता उत्पादन होणार की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना तत्काळ शासनातर्फे मदत देण्यात यावी. उपेंद्र मोहोड, शेतकरी, माधान.

नोटबंदीपासून दुष्टचक्र
नोटबंदी पासून हे दुष्टचक्र सुरु आहे. त्यावर्षीपासून दरवर्षी खर्च केला जातो. परंतु संत्रा फळबागेला लावलेले पैसेदेखील निघत नाही. शेती तोट्यात जात आहे. वेगवेगळ्या रोगांबरोबर कृत्रिम संकटेही काही कमी होत नाही. त्यामुळे शेती करावी कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राम मोहोड, शेतकरी, माधान.

निवडणूक आली तर आठवतो शेतकरी
आधी संत्राला चांगली फूट दिसली. मात्र शेवटी किती संत्रा झाडावर राहणार, हाच गंभीर प्रश्न आहे. सतत होत असलेल्या आर्थिक नुकसानामुळे कर्ज काढून शेती करावी लागत आहे. त्यात निवडणूक आली की शेतकरी आठवतो मग शेतकरी कोठे जातो. -सागर केदार, शेतकरी, देऊरवाडा.

बातम्या आणखी आहेत...