आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसाचा वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या संत्रा उत्पादक पट्ट्यासह संपूर्ण जिल्ह्यातील संत्रा बागांना जबर फटका बसला आहे. अतिपावसामुळे आंबिया बहाराला गळती लागली आहे. सुमारे २५ ते ३० टक्के फळ गळले आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा संत्र्याला अधिक भाव मिळण्याचा अंदाज असला तरी आंबिया बहाराच्या फळगळतीमुळे संत्रा उत्पादनाला तब्बल २५० कोटींच्या आसपास फटका बसणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
यंदा मृग पाठोपाठ आंबिया बहारही दगा देत असल्यामुळे लाखो रुपये खर्च करून भरघोस उत्पादनाची अपेक्षा उराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवर निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी फेरले जात असल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यात एकूण ७० हजार हेक्टरवर संत्रा बागांचे क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा सुमारे ४० ते ४५ हजार हेक्टरमध्ये आंबिया बहार घेतला जात आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे बागांमध्ये पाणी साचले, तर काही खरडून निघाल्यात. काही ठिकाणी वन्य प्राण्यांनी हैदोस घातला. ज्या काही बागा वाचल्या त्यांच्यावर रोगांनी अतिक्रमण केल्याने फळ गळती सुरू झाली. यापासून वाचण्यासाठी शेतकरी फवारणीवर खर्च करत आहेत, परंतु त्याचाही फायदा होताना दिसत नसल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.
बाष्पीभवन वाढले, प्राणवायू कमी मिळाल्याने नुकसान : सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे जुलै महिन्यात सूर्य फारच कमी प्रमाणात दिसला. यातच झाडाच्या मुळाशी सतत पाणी साचले होते. तसेच सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे बागेत बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले व प्राणवायूही झाडांना कमी मिळत नव्हता. झाडांच्या मुळाला बुरशी लागली व त्यामुळे फळगळ वाढली, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बागांना अतिपावसाचा बसला सर्वाधिक फटका
यावर्षी सुमारे ४५ हजार हेक्टरमध्ये आंबिया बहाराचा संत्रा घेण्यात येत आहे. जुलै महिन्यातील पावसाने सरासरी २५ टक्के फळगळ झाली आहे. हे प्रमाण सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बागांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक आहे. दरवर्षी आंबिया बहाराचे जिल्ह्यात एकूण उत्पादन ४ ते ४.५ लाख टन राहते. यंदा मात्र फळगळतीमुळे १ ते १.२५ लाख टनाचे नुकसान झाले आहे. सरासरी अडीच ते तीन हजार रुपये प्रतिटन भाव मिळेल, या अंदाजानुसार जिल्ह्यात संत्रा उत्पन्नाला सुमारे २५० कोटी रुपयांचा फटका बसेल असे चित्र आहे.-रमेश जिचकार, संत्रा अभ्यासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपूरी संत्रा उत्पादक कंपनी, वरूड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.