आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात विजेच्या तांडवात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. अंजनगाव सुर्जी येथील २१ वर्षीय रोशनी मंडवे, तिवसा तालुक्यातील वरुडा गावात शेतात काम करणारा १४ वर्षीय श्याम शिंदे तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथील शेतात काम करणारा १४ वर्षीय आयुष इंगळकर यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. तसेच नरेश मंडवे व रेशमा इंगळे हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिवासी तसेच देवगाव येथील १६ वर्षीय शंकर चौधरी जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासोबतच देवगाव येथील मातीचा पूल मुसळधार पावसाने वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे.
शेतात गेलेल्या दोन मुलांवर वीज कोसळली
धामणगाव रेल्वे |तालुक्यातील देवगाव परिसरात गुरुवार २३ रोजी झालेल्या धुवाधार पाऊस झाला. दरम्यान शेतामध्ये कपाशीची लागवड करायला गेलेले दोन शाळकरी मुलांवर वीज कोसळली. यात १४ वर्षीय आयुष राजेश इंगळकर हा जागीच मृत्यूमुखी पडला तर १६ वर्षीय शंकर सुधाकर चौधरी हा जखमी झाला. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारांकरिता हलवण्यात आले आहे.
धावत्या दुचाकीवर वीज पडून महिला ठार
दर्यापूर/अंजनगाव सुर्जी | वीज कोसळून दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या शेतकरी महिला रोशनी नरेश मंडवे (वय २१) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत महिलेचे पती नरेश दादाराव मंडवे (वय २४) हे किरकोळ जखमी झाले असून, ठार झालेल्या महिलेची १९ वर्षीय धाकटी बहिण रेशमा आनंद इंगळे ही गंभीर जखमी झाली आहे. दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील कोकर्डा फाट्यानजीक गुरुवाीी दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
देवगाव परिसरात मुसळधार पाऊस
धामणगाव रेल्वे तालुक्यात देवगाव येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती व यवतमाळला जोडणारा मातीचा भराव वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प पडली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वरुडा येथे वीज पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
तिवसा| शेतात मजुरी करण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार २३ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. श्याम निरंजन शिंदे (वय १४, रा. वरुडा) असे मृत मुलाचे नाव आहे. तिवसा तालुक्यातील वरुडा कोळून येथील शेत शिवारात टाचणीच्या मजुरीसाठी गेलेला श्याम शिंदे हा मुलगा शेतात काम करत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
देवगाव परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने गुरू वारला (ता.२३) दाणादाण उडवली आहे. मुसळधार पावसाने देवगाव-यवतमाळ मार्गावरील निर्माणाधीन पुला जवळील मातीचा रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यवतमाळ रस्त्यावर असलेला मातीचा पूल वाहत गेला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.