आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांशी संवाद:अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यांत जनावरांवर लम्पी राेगाचा प्रादुर्भाव

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १२ गावांमधील ३१४ गोवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने या परिसरातील सर्व जनावरांचे वेगाने लसीकरण व पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याच सोबत यातील २१७ बाधित जनावरे बरी होण्याच्या मार्गावर आहे. इतर पशूंवर उपचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले असून, आंतरराज्य व आंतरजिल्हा गोवर्गीय पशु वाहतूकीला प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

अमरावती जिल्ह्यात गायवर्गीय पशुधनामध्ये लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसा अहवाल पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे गोवर्गीय जनावरांची आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा वाहतूकही प्रतिबंधित करण्यात आली आहे. बाधित झालेले सर्व क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. लम्पी आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय कार्यदल स्थापित करण्यात आले असून त्यांनी तात्काळ रोग प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रास भेट देऊन आवश्यक कार्यवाही होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १४ शीघ्र कृती दले स्थापन करण्यात आली आहेत. तसेच पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.कावरे म्हणाले की, २०२० मध्ये जिल्ह्यात ९१४ पशूंवर प्रादुर्भाव आढळला होता. यंदा महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील पशुधनात ४ ऑगस्ट रोजी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सर्वप्रथम धारणी तालुक्यातील झिल्पी व पडिदाम येथील जनावरांमध्ये ३१ ऑगस्ट रोजी जनावरांमध्ये या रोगाची बाधा आढळून आली. तेथील २० जनावरांना लागण झाल्याचे आढळले.

अद्यापपर्यंत झिल्पी, पडिदामसह धारणी तालुक्यातील सावलखेड, सोनबर्डी, बाबंदा, धाराकोट, धूळघाट रोड, हिराबंबई या आठ गावांसह चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी व पिपादरी, तसेच अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी व वडगाव फत्तेपूर अश्या तीन तालुक्यातील बारा गावांमधील पशुधनात या आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत ३१४ जनावरांना लागण झाल्याचे आढळले. मेळघाटात काही ठिकाणी हा आजार देवीचा आजार असल्याची समजूत असल्याने योग्य उपचार तत्काळ मिळू न शकल्याने ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात दलांतर्फे वेगाने लसीकरण व पशुपालकांपर्यंत पोहोचून समुपदेशन व जनजागृती करण्यात येत आहे. या गावांमधील ५ कि.मी. अंतरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या परिसरात सुमारे २५ हजार जनावरे असून त्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘गोट फॉक्स’ लसीच्या ३० हजार मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंत ६ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. तसेच बाधित जनावरांचे विलगीकरण करण्याच्या सूचना पशुपालकांना देण्यात येत आहेत. सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...