आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिलाई मशीन:भातकुली न. पं. सीओ एसीबीच्या जाळ्यात

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भातकुली येथे एका महिलेला शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याकरता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करुन २० हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या भातकुली नगरपंचायतीच्या महिला मुख्याधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. ११) शहरातील न्यू महालक्ष्मीनगर येथे एसीबीच्या पथकाने केली.

करिश्मा सतीश वैद्य (२७) असे एसीबीने अटक केलेल्या मुख्याधिकाऱ्यांचे नाव आहे. या महिलेला शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते देण्यासाठी मुख्याधिकारी यांनी लाचेची मागणी केली होती.

यासंदर्भात महिलेने ३१ ऑक्टोबरला एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ नोव्हेंबरला पडताळणी केली. पडताळणीत मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी मुख्याधिकारी वैद्य राहत असलेल्या शहरातील भाड्याच्या घराजवळ सापळा रचण्यात आला.

मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी सदर महिलेला लाचेची २० हजारांची रक्कम घेऊन घरी बोलावून ती स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. या प्रकरणी मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय प्रवीणकुमार पाटील, पीआय केतन मांजरे, माधुरी साबळे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, राहुल वंजारी, गोवर्धन नाईक आदींनी केली आहे.

ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच
भातकुली येथील दुकानात शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्रासाठी एका महिलेने नगरपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यावर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी या महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
---------

बातम्या आणखी आहेत...