आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे स्थायी समितीची सभा केवळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पूर्वीच्या प्रशासकीय राजवटीचा अपवाद सोडला तर पदाधिकाऱ्यांविना अशा बैठकी होणे, हा प्रसंग लोकशाही मान्य केलेल्या राज्य व्यवस्थेत इतिहासात पहिल्यांदाच बघायला मिळाला.
लोकनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हा परिषदेत आठ मार्चपासून प्रशासक राज सुरू झाले. सीईओ अविश्यांत पंडा हेच सध्या प्रशासक आहेत. दरम्यान पदाधिकारी नसले तरी वेगवेगळ्या समित्यांच्या नियमित बैठका घेणे प्रशासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. याच शृंखलेत शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेचे सीईओ तथा प्रशासक अविश्यांत पंडा यांनी स्थायी, जलव्यवस्थापन, बांधकाम व आरोग्य अशा चार समित्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये नेहमीप्रमाणेच विषयनिहाय चर्चा करुन शेवटी निर्णयही घेतले गेले.
चारही बैठकांच्या अध्यक्षस्थानी प्रशासक अविश्यांत पंडा होते. आरोग्य समितीच्या बैठकीची मांडणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी केली. तर बांधकाम समितीच्या कामकाजाचा आशय त्या विभागाचे कार्यकारी अभियंता विजय वाठ यांनी स्पष्ट केला. जलव्यवस्थापन समितीचे विषय त्या विभागाचे कार्यकारी अभियंता सावलकर यांनी मांडले. चर्चेअंती काही नवे निर्णयही बैठकांमध्ये घेण्यात आले.
त्याचवेळी गेल्या महिन्यात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभांच्या कामकाजाचा विशेषत: अनुपालन अहवालाचा आढावा घेण्यात आला. कामकाजात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. निरवणे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीराम कुळकर्णी व बांधकाम विभागाचे अभियंता लाहोरे यांच्यासह इतर विभागप्रमुख व निमंत्रितांनी सहभाग घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.