आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:अमरावतीत दोन कवींवर पीएचडी, साहित्य क्षेत्रात खोवला जाणार मानाचा तुरा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दोन प्रसिद्ध कवी बबन सराडकर व विष्णू सोळंके यांच्या कवितांवर पीएचडी केली जाणार आहे. एखाद्या स्थानिक साहित्यिकाच्या साहित्यावर थेट शोधप्रबंध सादर करुन आचार्य पदवी प्राप्त होणार असल्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे अमरावतीच्या साहित्य क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

अरुणा टोंगसे आणि किशोर गाडबैल अशी शोधप्रबंध सादर करुन आचार्य (पीएचडी) पदवी मिळविण्यासाठी अभ्यास करणाऱ्या शोधार्थींची नावे आहेत. या दोन्ही शोधार्थींनी अनुक्रमे ‘कवि बबन सराडकर यांच्या समग्र कवितेचे चिकित्सक अध्ययन’ आणि ‘कवि विष्णू सोळंके यांच्या समग्र साहित्याचे चिकित्सक अध्ययन’ या विषयांवर शोधप्रबंध सादर करण्याचे ठरविले आहे. दरम्यान शोधप्रबंधासाठीचे हे दोन्ही विषय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्वीकारले असून संबंधितांचा आचार्य पदवी प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अरुणा टोंगसे यांची पीएचडी बबन सराडकर यांच्या कवितांवर आधारित असून त्यासाठी त्यांना डॉ. ए.एस. धाबे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर किशोर गाडबैल यांची पीएचडी विष्णू सोळंके यांच्या साहित्यावर आधारित असून त्यासाठी त्यांनाही डॉ. ए.एस. धाबे हेच मार्गदर्शन करणार आहेत.

सदर शोधप्रबंधांमुळे दोन्ही कविंच्या साहित्याची सविस्तर उकल समाजापुढे येणार असून त्यांच्या साहित्याव्दारे समृद्ध झालेले साहित्यक्षेत्र आणि समाजाचे झालेले प्रबोधन याचेही ठोकताळे स्पष्ट होणार आहे. विद्यापीठाच्या रिसर्च अँड रिक्गनिशन कमीटीची तीन दिवसीय बैठक अलिकडेच पार पडली. या बैठकीत दोन्ही विषयांना मान्यता देण्यात आली. या घडामोडीमुळे शोधार्थी आणि शोधार्थींना विषय उपलब्ध करुन देणारे दोन्ही कवि तथा मार्गदर्शक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.