आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्याची संधी अभावानेच मिळते. अमरावतीच्या आतापर्यंतच्या इतिहासात अशी संधी बोटावर मोजण्याइतपत कलावंतांनाच मिळाली आहे. येथील शिक्षक सुनील यावलीकर आणि त्यांची कन्या वैखरी यांनी अशी संधी मिळण्याचा इतिहास पहिल्यांदाच रचला आहे.
मार्च २०२२ मध्ये सुनील यावलीकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहागीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांची मुलगी वैखरी यावलीकर हिच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरवले जात आहे. वर्षभरातच बाप लेकाच्या छायाचित्रांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरण्याचा हा अनोखा योग त्यांच्या कर्तृत्वामुळे जुळून आला असून कला क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले आहे. १४ ते २० डिसेंबरदरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.
वैखरी ही पुण्याच्या डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी असून तिने ऑर्केलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर सुनील यावलीकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांतील नेमकेपण हेरून त्याला कला, क्रीडा, गीत-संगीत, वक्तृत्व आणि अभ्यास या सर्वच आघाड्यांवर अव्वल आणि अस्सल करायचे, असा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. त्याच प्रयोगातून त्यांनी वैखरीलाही घडवले. त्यामुळेच वयाच्या २४ व्या वर्षी तिच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहागीर आर्ट गॅलरीत भरवले जात आहे तर सुनील यावलीकर यांना तो क्षण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वयाची ५२ वर्षे पूर्ण करावी लागली.
‘द फ्रेम’ मधून दिसणार जीवनाचे विविध रंग वैखरी यावलीकर हिच्या छायाचित्र प्रदर्शनाची थीम ही ‘लाईफ इन लाइट अँड शॅडो’ अशी आहे. ‘द फ्रेम’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या नावाने ती सर्वांपुढे जाईल. अर्थात जहागीर आर्ट गॅलरीला भेट देणाऱ्या सर्व कलावंतांना द फ्रेम च्या माध्यमातून ही चित्रे बघायला मिळतील. यामध्ये निसर्ग चित्रांसमवेत कष्टकऱ्यांचे जीवन, कलावंतांचा जीवनप्रवास, पुरातन वास्तू आदी विषयांचा समावेश आहे. यापूर्वी या अमरावतीकरांना मिळाली संधी जहागीर आर्ट गॅलरीत यापूर्वी संधी मिळालेल्या अमरावतीकरांमध्ये मोजक्या कलावंतांचा समावेश आहे. यापैकी काहींनी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले तर काहींनी चित्र, शिल्पाच्या माध्यमातून या गॅलरीत प्रवेश केला होता. जाणकारांच्या मते यामध्ये उज्ज्वल पंडेकर, सुधीर मोदे, विजय राऊत, राज यावलीकर, सी. आर. शेलारे, सुनील यावलीकर आदींचा समावेश आहे. वैखरी यावलीकर मुंबईच्या जहागीर आर्ट गॅलरीत भरणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनात वैखरी यावलीकर यांनी काढलेली अशी छायाचित्रे पाहावयास मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.