आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:रस्त्याअभावी वरुड खुर्दवासीयांचे हाल; चिखलातून शोधताहेत वाट, गावात जायला दुसरा रस्ता नाही

अंजनगाव सुर्जी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरुड खुर्द येथे गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने कच्च्या रस्त्याने चिखलातून वाट काढत नागरिकांना घर गाठावे लागत आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याची सोय करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही त्याची दखल न घेतल्या गेल्याने वरुड खुर्दवासियांनी संताप व्यक्त केला आहे.

वरड खुर्द येथे गावात जाण्यासाठी मुऱ्हा देवी येथून रस्ता जातो, परंतु या दोन गावांच्यामध्ये शहानूर नदी असून त्यावर पुलाचे काम सुरू आहे. एकमेव असलेल्या या रस्त्यावर काम सुरू आहे, तर गावात जाण्यासाठी पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने नागरिकांची चांगलीच अडचण होत आहे. मुऱ्हादेवी ते सातेगाव या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत पुर्ण करण्यात आले आहे. याच रस्त्यावर येणाऱ्या मुऱ्हादेवी व वरुड खुर्द या दोन गावांच्या मधातून वाहत असलेली शहानूर नदीवर पुलाचे काम पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून होत आहे. वरुड खुर्द येथे जाण्यासाठी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणचा जुना पूल हा एकमेव मार्ग होता.

कंत्राटदारांनी वरुड खुर्द ला जागण्याकरिता नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरूपात मातीचा रस्ता तयार केला, परंतु या मातीच्या रस्त्यावरून पावसाच्या पाण्यामुळे जाणे शक्य नसल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हात होत आहेत. याबाबत वरुड खुर्दचे सरपंच रवि बोंद्रे यांनी संबंधित कंत्राटदार व पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून पर्यायी रस्त्याची मागणी केली, परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. चिखलातून जाणाऱ्या या वाटेवरून पायदळ जाणे दुरापास्त झाले कोणतीही वाहने या मार्गावरून जावू शकत नाहीत. नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेने लावावी लागत आहे. त्यामुळे वाहने चोरीला जाण्याचा धोकादेखील बळावला असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागणीकडे संबंधितांनी केले दुर्लक्ष
वरुड खुर्द येथे गावात जागण्याकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याकरिता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडे मागील महिनाभरापासून मागणी करण्यात येत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता पावसाळ्यात गावातील नागरिकांनी कुठून जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. - रवी बोंद्रे, सरपंच, वरुड खुर्द

तत्काळ व्यवस्था करू
वरुड खुर्द येथील नागरिकांना गावात ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तत्काळ व्यवस्था करून देण्यात येईल. नंतर त्यावर आणखी काही उपाय योजना करता येतील का ते बघू. - भूषण कांबळे, सहाय्यक अभियंता, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना

बातम्या आणखी आहेत...