आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:पोलिसाने ब्लड बँक गाठली अन् दिले रक्त!, वर्दीची अशीही ‘ड्यूटी’; पत्नीसाठी रक्ताच्या शोधात असलेल्या पतीला मदत

दिव्य मराठी विशेष2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायंकाळी सात वाजेची वेळ होती. वाहतूक शाखेला कार्यरत असलेले अमर पटेल कार्यालयात हजर होते. त्याचवेळी ४० ते ४५ वर्षीय एक व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचला. पायात टायरी चप्पल, पोषाख जरा मध्यमच. चेहऱ्यावर चिंतेचे प्रचंड ढग दाटल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. तो भावूक स्वरातच पटेल यांना म्हणाला, साहेब मला मदत करा, माझ्या पत्नीची डफरिनमध्ये प्रसूती झाली, रक्तस्त्राव भरपूर झाला. त्यामुळे रक्ताची प्रचंड गरज आहे. सकाळपासून शोधतोय पण अजूनही रक्त मिळाले नाही. हे एेकून अमर यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला स्वत:च्या दुचाकीवर बसवले आणि थेट पीडीएमसीची रक्तपेढी गाठली. त्याठिकाणी स्वत: रक्त दिले. त्यानंतर काही वेळातच पटेल यांनी दिलेले रक्त त्या प्रसूत महिलेला देण्यात आले. अमर यांच्या या चौकटीबाहेरच्या कामगिरीला अनेकांनी सलाम केला.

अमरकुमार दिनानाथजी पटेल ( वय ३६) शहर वाहतूक शाखेच्या पश्चिम विभागाला कार्यरत आहेत. शनिवारी (दि. १४) सायंकाळी सातच्या सुमारास एक व्यक्ती वाहतूक शाखेच्या कार्यालयात आला. त्या व्यक्तीची अमर यांच्यासोबत भेट झाली. त्या व्यक्तीने सांगितले की, मला रक्ताची गरज आहे. पत्नीची प्रसूती झाली आहे. मात्र, मला कुठेही रक्त मिळाले नाही. त्या व्यक्तीला घेऊन अमर यांनी डफरीनमध्ये आले.. नंतर पीडीएमसीची रक्तपेढी गाठली. चौकशी केली असता ‘ओ पॉझिटिव्ह ग्रुप’चे रक्त उपलब्ध नसल्याचे समोर आले.

रक्त दाता दिल्यास आम्ही तत्काळ प्रक्रिया करुन रक्त देवू, असा शब्द अमर यांना रक्तपेढीत उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिला. त्यावेळी अमर पटेल यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वत: रक्त दिले. रक्त काढल्यानंतर आवश्यक प्रकिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वगळता एक मिनिटही जास्त न घेता पीडीएमसी रक्तपेढीतून ते रक्त अमर पटेल यांना देण्यात आले. ज्या व्यक्तीच्या पत्नीसाठी रक्त हवे होते, त्यांची परिस्थितीसुद्धा जेमतेमच होती. त्यामुळे पटेल यांनीच आठशे रुपये रक्तपेढीत भरले आणि रक्त घेऊन पुन्हा त्यांना डफरिनमध्ये रक्तासह आणून सोडले. त्यानंतर तत्काळ त्या प्रसूत महिलेला रक्त देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...