आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू जप्त:ग्राहक बनून गेले पोलिस अन् 23 चायना चाकू केले जप्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मागील काही दिवसांपासून झालेले खून व प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यात बहुतांश चायना चाकूंचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या चाकूंची विक्री कोण करणे, याबाबत माहिती काढली. दरम्यान, शनिवारी (दि. ३) उशिरा रात्री पोलिसांनी ग्राहक बनून शहरातील पठाणपुऱ्यातील एका तरुणाच्या घरी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना धारदार २३ चायना चाकू जप्त करण्यात यश आले. यावेळी चाकूची अवैध विक्री करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. चाकू विक्री करणाऱ्याकडून एकाचवेळी मोठ्या संख्येत चाकू जप्तीची शहरात अलीकडे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

सैय्यद आमीन सय्यद सादीक (२३, रा. पठाणपुरा, अमरावती) असे पोलिसांनी पकडलेल्या चायना चाकू विक्रेत्याचे नाव आहे. सय्यद आमीन हा शहरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून अवैधपणे चायना चाकू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पीएसआय नरेशकुमार मुंडे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होतेच. दरम्यान, शनिवारी रात्री पीएसआय मुंडे यांच्या पथकातील दोन पोलिसांनी ‘डमी’ ग्राहक बनून सय्यद आमीनसोबत संपर्क केला व आम्हाला दोन चाकू हवे असल्याचे सांगितले. ग्राहक असल्यामुळे आमीनसुद्धा त्यांच्यासोबत बोलला. दरम्यान, शनिवारी उशिरा रात्री त्याने ग्राहक बनलेल्या पोलिसांना नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनीतील मनपा बगिच्याजवळ चाकू घेण्यासाठी बोलवले.

यावेळी पोलिस पोहोचले आणि तोसुद्धा चाकू घेवून आला. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू घेतले, त्याचवेळी त्याला ताब्यात घेवून त्याची घर झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी २२ चायना व एक गावठी असे एकूण २३ चाकू त्याच्या खोलीतून जप्त केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रत्येक चायना चाकूचे पाते १० इंच लांबीचे आहेत तसेच त्यामध्ये लाईट सुद्धा लागताे. या सर्व चाकूंना लाल रंगाचे कव्हर सुद्धा होते. पोलिसांनी हे २३ चाकू जप्त करुन सय्यद आमीनला अवैध शस्त्र विक्रीप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय अर्जून ठोसरे, पीएसआय नरेश कुमार मुंडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

ऑनलाइन विक्रीवर निर्बंध असतानाही शहरात चायना चाकू
वर्षभरापूर्वीच पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विक्री करणाऱ्या संबंधित एजन्सींना पत्र देवून शहरात कोणत्याही प्रकारच्या चाकूची किंवा शस्त्रांची विक्री करण्याबाबत निर्बंध लावल्याबाबत पत्र दिले होते. असे असतानाही शहरात चायना चाकू येतात कसे? हा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला होता. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध मार्गाने अशाप्रकारे चाकूची सर्रासपणे विक्री होत असल्याचे आता समोर आले आहे. शहरात अजूनही काही विक्रेते आहेत का? याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...