आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात 90 जणांचे रक्तदान:रक्तक्षय, गर्भवती, स्तनदा आदिवासी महिलांसाठी डॉक्टरांचे सकारात्मक पाऊल

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचा आदिवासी - कोरकुबहुल परिसर असलेल्या मेळघाटमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते जिल्हा परिषदेसारख्या निमसरकारी यंत्रणेने आयोजित केले होते. या शिबिरात जिल्हा परिषदेच्या 90 अधिकारी - कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्याला हातभार लावला. या शिबिरात रक्त गरोदर, स्तनदा माता व रक्त कमी असलेल्या आदिवासी महिलांसाठी उपयोगात आणले जाईल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी महेश पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज आडे, डॉ. शुभम मालवीय, सहाय्यक गट विकास अधिकारी मयुर दलाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन राठोड, धारणीचे गट शिक्षणाधिकारी घवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यापैकी बहुतेकांनी प्रत्यक्ष रक्तदानातही सहभाग नोंदविला. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला होता. दरम्यान सदर यंत्रणेमार्फत आतापर्यंत आयोजित केल्या गेलेल्या रक्तदान शिबिरांपैकी या शिबिरातील सहभाग हा विक्रमी ठरला, असे जि.प. प्रशासनाचे म्हणणे आहे. या शिबिरात 90 जणांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.

अतिदुर्गम क्षेत्रात काम करताना गरोदर माता, स्तनदा माता यांना अनेकदा रक्तक्षय असल्याचे आढळून येते. त्यामुळे उपचारावेळी त्यांच्यासाठी रक्ताची गरज भासते. परंतु तातडीच्या प्रसंगी रक्त मिळणे कठीण जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत मेळघाटात नियमितपणे रक्तदान शिबिरे भरविली जात असल्याची माहिती गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी यावेळी दिली. शिबिरात महिला अधिकारी व कर्माचाऱ्यांचा सहभागही लक्षणीय होता.

आरोग्य सेवक पंकज मोहोड यांनी 51 व्या वेळी रक्तदान केले. याशिवाय हनुमान सिडाम, विस्तार अधिकार (पंचायत) नितीन सुपले, कृषी अधिकारी रवी राणे, धैर्यशील पाटील, कल्पना दाभाडे, पंकज दिघाडे, कल्पना शिरसाट, सुधीर मंडवे, प्रमोद सपकाळ, कविता पवार, योगेश मालविय, कालुराम झामरकर, राजेंद्र चकुले, ज्योती चांदेकर, रवि मेटकर, अमोल टिपरे, सुशीला कळमेकर आदी अधिकारी व कर्मचा-यांपैकी अनेकांनी रक्तदान केले तर इतरांनी इतरांना प्रोत्साहित करुन त्यांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करुन घेतले.

धारणीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांच्या मार्गदर्शनात मध्यप्रदेशातील बुऱ्हानपुर येथील रक्तपेढीतील डॉक्टरांनी रक्तदान करवून घेतले. डॉ. नसीम व त्यांच्या चमूने शिबीर यशस्वी करण्यासाठी पुरेपूर सहकार्य केले. दरम्यान शासकीय रूग्णालयांतील रुग्णांसाठी बुऱ्हानपुरच्या रक्तपेढीतर्फे विनामूल्य रक्तपुरवठा करण्यात येईल, असे डॉ. नसीम यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...