आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा वर्मा यांचे प्रतिपादन:आर्थिक सक्षमीकरणासाठी सकारात्मकता निर्माण करावी

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेशन करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमित आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सुचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी शुक्रवार २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या.

आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपूर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक नरेंद्र येते, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के. विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरुकुल फाउंडेशच्या संचालिका निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.

५ हजार ४६५ महिलांनी केली नोंदणी
अमरावती, नागपुर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छूक ५ हजार ४६५ महिलांनी नोंदणी केली असून २ हजार २२४ महिलांनी ऑन लाईन चाळणी परीक्षा दिली. त्यापैंकी १ हजार ३०७ महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...