आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती शहराच्या प्रमुख रस्त्यांवरील ‘रस्ता दुभाजक बनले कचराकुंड्या; झुडुपे, फांद्यांमुळे अपघाताचाही धोका’ या मथळ्याखाली ग्राउंड रिपोर्ट सोमवारी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाला. या वृत्ताची दखल घेत रस्ता दुभाजकांची देखभाल व दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
त्यांच्या मते या कामाचे इस्टिमेंट तयार आहे. त्यासाठीच्या इतर बाबीही पूर्ण केल्या आहेत. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने कायदेशीर बाबींचा विचार करून लवकरच या मुद्याकडे लक्ष वेधले जाईल. रस्ता दुभाजकांवरील झाडे काही भागात निष्पर्ण झाली असून, काही जागी कचरा साचल्याचे तसेच दुभाजकांमधील झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याचे त्यांनी मान्य केले. सोबतच या बाबीकडे मनपा प्रशासनाने आधीच लक्ष वेधले असून, जुजबी दुरुस्तीचा प्रारंभ लवकरच केला जाईल, असेही स्पष्ट केले.
अमरावती शहराच्या विविध भागांतून नागपूर, चांदूर रेल्वे, परतवाडा, यवतमाळ-अकोलाकडे जाणाऱ्या गुळगुळीत व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील दुभाजकांकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असून, देखभाल व दुरुस्तीअभावी त्याचे तीन-तेरा वाजले आहे. त्यामुळे कधी काळी आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करणारे हे दुभाजक आज चक्क ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठले आहेत, हे ‘दिव्य मराठी’ने मांडले होते.
‘अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडून काम घेतले पाहिजे’ सदर वृत्ताबाबत माजी पालकमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनीही ‘दिव्य मराठी’ला फोन करून देखभाल, दुरुस्तीबाबतची वास्तविकता स्पष्ट केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुभाजकांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम करतानाच त्या-त्या कंत्राटदारांवर सोपवली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून विशिष्ट कालखंडानंतर त्यांच्याकडूनच ही कामे करून घेतली पाहिजे. दरम्यान अधिकारी तेवढेही करू शकत नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे, डॉ. सुनील देशमुख पालकमंत्री असतानाच यापैकी बहुतेक रस्ते व त्यावरील दुभाजक बांधले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.