आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन योजना लागू करणे, बीएलओचे काम शिक्षकांकडून काढून घेणे, मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधन वाढविणे आदी मुद्द्यांबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ गंभीर मंथन करीत असून यातील सुधारणांसाठी आगामी काळात आंदोलन केले जाणार आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा मेघालयची राजधानी शिलाँग येथे नुकतीच पार पडली.
अमरावतीचे किरण पाटील यांनी या सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. सदर सभेतील निर्णयानुसार या महिन्यात राज्याची राजधानी मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाईल. काही राज्यांमध्ये भोजन योजनेचे फोटो रोजच्या रोज पाठविणे अनिवार्य केले आहे. याबाबत सदर सभेत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बाल श्रमिक कायद्यामध्ये केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांमुळे काही बालक शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
दरम्यान शाळाबाह्य मुलांना प्रवेशित करण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व सभासदांनी प्रयत्न करावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रामपाल सिंग यांनी केले आहे. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ गेल्या पंधरा वर्षापासून लढा देत आहे. परंतु अजूनही अंतिम यशस्वीता प्राप्त झालेली नाही. म्हणून आरपारच्या लढाईसाठी नियोजन या सभेमध्ये करण्यात आले.
इतर कर्मचारी संघटनांना सोबत घेऊन ही लढाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये आंदोलनात्मक कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक राज्याच्या राजधानीत या महिन्यात प्रातिनिधिक धरणे आंदोलन केले जाईल.
दरम्यान डिसेंबर- जानेवारी २०२२-२३ ला सर्व राज्यांचे संसद सदस्य, विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री व शिक्षण मंत्री, विरोधी पक्ष नेते यांना निवेदन देणे, सातवा वेतन आयोग सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात लागू करण्यात यावा तसेच कोणतीही शासकीय शाळा बंद करण्यात येऊ नये. शिक्षण सेवक म्हणून नेमणूक न करता पूर्ण वेतनावर शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात आदी मागण्यांचाही या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पुढील नियोजनासाठी एक तीन सदस्य समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष रामचंद्र डबास (दिल्ली), कोषाध्यक्ष हरीहरण (केरळ) व जनरल कौन्सिल मेंबर किरण पाटील (महाराष्ट्र) यांचा समावेश करण्यात आला.
केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी २३ राज्यातील २७२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष देविदास बसवदे, सरचिटणीस कल्याण लवांडे, उपाध्यक्ष किरण पाटील, कार्याध्यक्ष अण्णाराव आडे, राज्य महिला आघाडी प्रमुख वंदना भोयर, कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, केशव बुरडे, दिवाकर पांगुळ, राकेश गोनेलवार या १२ जणांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.