आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य डॉ. खोडसकर यांना योग क्षेत्रातील जीवनगौरव जाहीर:आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग मार्गदर्शक म्हणून ख्याती

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग मार्गदर्शक तसेच विख्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे माजी प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर यांची राष्ट्रीय योगासन व क्रीडा फेडरेशन दिल्लीतर्फे महाराष्ट्रातून योग क्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कारा करता निवड करण्यात आली आहे. जोधपूर येथे येत्या काही दिवसांत त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राष्ट्रीय योगासन व क्रीडा फेडरेशन हे भारतातील एकमेव असे फेडरेशन आहे,ज्याला केंद्र सरकारचे क्रीडा खाते व भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे.

डॉ. खोडस्कर हे मागील 47 वर्षांपासून योग, क्रीडा, शिक्षण व आदिवासी उत्थान क्षेत्रात कार्यरत आहेत. एचव्हीपीएमच्या माध्यमातून अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योग संमेलन, योगासन स्पर्धा, योग कार्यशाळा त्यांनी 18 देशांत आयोजित केल्या आहेत. यात इंडोनेशिया, मॉरिशियस, केनिया, सिंगापूर, बँकॉक, मालदीव, मलेशिया, जपान, चीन, नेपाळ, इत्यादी देशांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रीडा खात्याने सहा वेळा व सेशल्सच्या क्रीडा खात्याने दोन वेळा त्यांना त्यांच्या देशात योग कार्यशाळा आयोजित करण्यात निमंत्रित केले होते.

राज्य शासनाने त्यांच्या कार्याबद्दल आदिवासी सेवक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार, सांगली येथील विश्वदर्शन योग संस्थेने महाराष्ट्र योग भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. बृहन महाराष्ट्र योग परिषद या राज्यस्तरीय योग संघटनेचे 1977 पासून संस्थापक महासचिव म्हणून, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून 2012 पासून व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या योगशास्त्राच्या अभ्यास मंडळावर (अस्थायी ) 2005 पासून डाॅ. खोडस्कर कार्यरत असून विद्यापीठात योग अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे येथील महाराष्ट्र शिक्षण मंडळ अंतर्गत आरोग्य व शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळावर पाच वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनात 20 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली असून विद्यापीठ अनुदान आयोग दिल्लीद्वारे त्यांच्या " बंदीजणांच्या मनोवृत्तीवर योगाचा परिणाम" या संशोधन प्रकल्पाला सहा लाखाची संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. योगशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

एचव्हीपीएमतर्फे चिखलदरा येथे 1977 पासून योग शिबिरांचे आयोजन करण्यात, चिखलदरा येथे गिरिजन विद्यालय तसेच शारीरिक शिक्षण महाविद्यालय व हरीसाल, हातरू, गौरखेडा (कुंभी) व अमरावती येथे आश्रम शाळा सुरू करण्यात एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तसेच मंडळाच्या मार्गदर्शनात शासनाच्या आदिवासी विभागातर्फे शासकीय आश्रम शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने 450 क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात डॉ. खोडस्कर यांचा सक्रिय सहभाग राहिला.

बातम्या आणखी आहेत...