आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकदिनी मुख्यमंत्र्याकडे मागणी:मेळघाटातील स्थलांतरितांना आहे त्या जागी शिक्षण उपलब्ध करून द्या

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाच्या शोधात मेळघाटातील नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावांत स्थलांतर करावे लागते. अशावेळी त्यांच्यासोबत शाळेत जाणारी त्यांची मुलेही असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना आहे त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच गणित, विज्ञानच्या शिक्षकांची रिक्त असलेली पदे त्वरेने भरण्याची मागणी केली.

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्ह्यातील दहा शिक्षकांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममध्ये (व्हीसी रुम) ऑनलाइन संवाद पार पडला. या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा येथील जि. प. शाळेच्या शिक्षिका जयश्री गुल्हाने आणि भानखेडा येथील अतुल ठाकरे या दोन शिक्षकांना मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्याची संधी मिळाली. गुल्हाने यांनी स्थलांतरित विद्यार्थ्यांचा, तर ठाकरे यांनी शिक्षकांच्या रिक्त जागांचा मुद्दा मांडला. या दोन्ही बाबी मुख्यमंत्र्यांनी नोंद करून घेतल्या. जिल्ह्यात गणित आणि विज्ञान विषयाच्या १५७ शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे या विषयांच्या शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

दरम्यान, जयश्री गुल्हाने यांनी मेळघाटातील स्थलांतरामुळे त्या भागातील आदिवासी-कोरकू मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. पर्यायाने शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढते, असा मुद्दा मांडला. त्याचवेळी खंड पडू नये म्हणून पालकांसोबत गावोगावी जाणाऱ्या शाळकरी मुलांना आहे, त्या ठिकाणी शिकण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आणखी एक शिक्षक संजय रामावत यांना स्काऊट-गाईड प्रशिक्षण केंद्र या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. परंतु व्हीसी सुरू होण्यापूर्वी शासनातर्फे प्राप्त सूचनेनुसार केवळ दोनच शिक्षकांना प्रत्यक्ष मुद्दा मांडण्याची संधी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. या वेळी जि. प. सीईओ अविश्यांत पंडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे आदी अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...