आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिदुर्गम भागात वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांनी दिले. प्रधान मुख्य वन संरक्षकांनी नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालक जयोती बॅनर्जी, औरंगाबाद वनवृत्त मुख्य वनसंरक्षक सत्यजीत गुजर यावेळी उपस्थित होते.
लिमये यांनी व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. गुगामल वन्यजीव विभागातील कोहा नाक्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एसटीपीएफ कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
अकोट आणि गुगामल वन्यजीव विभागातील अतिदुर्गम भागातील कोकरजांबू व गुगामल संरक्षक कुटींनाही प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भेट दिली. अतिदुर्गम भागातील वन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले. धारगड वनपरिक्षेत्र मुख्यालयालाही लिमये यांनी भेट दिली. वणवा नियंत्रण व वन संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोजंदारी वनमजूर, वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक, उपवन संरक्षक यांचा गौरव यावेळी त्यांच्या हस्ते झाला. यावेळी वन कामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुमंत सोळंके, धूळ घाट वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहणकर, विभागीय वनाधिकारी नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक इंद्रजीत निकम, विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार यांच्यासह विविध अधिकारी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते.
अवैध चराई रोखण्यासाठी चिचाथावडा वनसंरक्षक कुटी :
धूळघाट वन्यजीव परिक्षेत्रात चिचाथावडा येथे वनसंरक्षक कुटीचेही उद्घाटन लिमये यांच्या हस्ते झाले. ही संरक्षक कुटी महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. सालई झाडाचा गोंद काढण्यासाठी होणारे करवे व अवैध चराई रोखण्यासाठी ही कुटी महत्वपूर्ण आहे. कोरकू बांधवांच्या लोकनृत्याचा कार्यक्रमही यावेळी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.