आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिलिव्ह फाउंडेशन आणि मराठी कट्टाद्वारे आयोजित एका कार्यक्रमात अमरावती शहरातील यशस्वी कर्तृत्ववानांचा संग्रह असलेल्या ‘नामवंत’ चे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार शशिकांत ओहळे यांनी हे पुस्तक लिहले असून अमरावतीकरांसाठी तो मोठा ठेवा आहे, अशा शब्दात मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक केले.
यशस्वी उद्योजक तथा जाधव इंडस्ट्रीजचे संचालक संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर, अमरावतीचे विकासपुरुष डॉ. सुनील देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शोभा रोकडे, निवृत्त अधिकारी जी बी. देशमुख आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या सर्वांनी सदर पुस्तक दर्जेदार असल्याच्या भावना व्यक्त करीत ओहळे यांच्या लेखनाचे मनापासून कौतुक केले. अमरावतीच्या उद्योग, वैद्यकीय व्यवसाय, समाजकारण, व्यापार व इतर व्यवसाय आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या कार्य कर्तृत्वाचा लिखित संदर्भ देणारे हे पुस्तक आहे.
डॉ. सुनीलभाऊ देशमुख यांनी त्यांचे विचार व्यक्त करताना विविध विषयांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, इतिहास लिहणे अत्यंत आवश्यक आहे. आजही अमरावतीचा इतिहास फक्त दोन वा तीन व्यक्तींनीच लिहिला आहे. समाजातील ह्या रत्नांना प्रकाशात आणावे लागेल. हे कठिण काम शशिकांत ओहळे यांनी केले आहे. त्यांच्यामते शहराचा विकास करण्यासाठी राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक, समाजकारणी ह्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यशोमती ठाकूर यांनी शशिकांत ओहळे यांचे कौतुक करून त्यांनी नामवंत भाग-2 च्या तयारीला लागावे, अशी विनंती केली. सोबतच त्यासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. अमरावतीचा गौरवशाली इतिहास हा जपला गेला पाहिजे असे सांगत त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. नामवंत पुस्तकाच्या निमित्ताने दादांना जपणे जसे आवश्यक आहे, तसेच नामवंतांना जपणे हा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले,
गौतम देशमुख यांनी कार्यक्रमात हास्याची पेरणी करत रंगत आणली. अनेक नव्या-जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. डॉ. शोभा रोकडे यांनी शशिकांत दादांचे कौतुक करताना त्यांच्या हातून भविष्यात अशाच दर्जेदार पुस्तकाची निर्मिती होवो, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात आपले अनुभव कथन केले.
शशिकांत ओहळे यांनी यावेळी खुमासदार मनोगत व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सांगितले की मागील वर्षी त्यांच्या जननायक पुस्तकाचे प्रकाशन ह्याच सभागृहात झाले होते. पण त्यावेळी मी पुन्हा येणार असे बोललो नव्हतो. पण मी परत आलोय, अशी मिश्किल टिपणी करताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.