आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमासाठी वाट्टेल ते:प्रेयसीला भेटण्यासाठी पंजाबचा प्रियकर थेट परतवाड्यात; पळून जाताना नागपूरमध्ये पकडले

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील लुधियाना येथे राहणारा एक 17 वर्षीय प्रियकर थेट परतवाड्यात आला आहे. 15 वर्षीय प्रेयसीला थेट पंजाबमध्ये पळवून घेऊन जाण्यासाठी निघाला. ते दोघे नागपूरपर्यंत पोहचले मात्र, नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांना शंका आल्यामुळे त्यांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा त्या मुलाने मुलीला पळवून आणल्याचे समोर आले. ही माहिती तत्काळ परतवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी नागपूर गाठून दोघांनाही परतवाड्यात आणले. त्या 17 वर्षीय मुलाविरुध्द बुधवारी (दि. 15) अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले.

सोशल मीडियावर ओळख

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाची सुमारे वर्षभरापूर्वी परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी 15 वर्ष मुलीसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. ओळखीचे रूपातंर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. दरम्यान, प्रेयसीला पंजाबमध्ये घेवून जाण्यासाठी हा अल्पवयीन प्रियकर मंगळवारी मध्यरात्री दोन ते सव्वा दोन वाजताच्या सुमारास परतवाड्यात पोहोचला. तत्पुर्वी त्याचे मुलीसोबत फोनवर बोलणे झाले होते. प्रियकराने त्याचवेळी 15 वर्षीय मुलीला सोबत घेऊन पंजाबमध्ये जाण्यासाठी मध्यरात्रीच परतवाड्यातून नागपूर गाठले. कारण, लुधियाना जाण्यासाठी नागपुरातून त्यांना रेल्वे पकडायची होती.

पोलिसांना आला संशय

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तीच्या कुटूंबियांनी शोधाशोध सुरू केली. मुलीचे वडील तत्काळ परतवाडा पोलिसात पोहोचले. दुसरीकडे हे 'टिनेज कपल' नागपुरात पोहचले होते. त्यांना पंजाबमध्ये जाण्यासाठी रेल्वेची प्रतिक्षा होती. मात्र रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व मुलगा दिसल्यामुळे रेल्वे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला, त्यांनी दोघांचीही विचारपूस सुरू केली. त्यावेळी मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे नागपूर रेल्वे पोलिसांनी तत्काळ ही माहिती परतवाडा पोलिसांना दिली.

अपहरणाचा गुन्हा दाखल

माहिती मिळताच परतवाडा पोलिस नागपुरात गेले व बुधवारी (दि. 15) त्या मुलासह मुलीला परतवाड्यात घेऊन आले. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनूसार, हा मुलगा मुलीचे अपहरण करुन तीच्यासोबत शारीरिक अत्याचार करण्यासाठी पंजाबमध्ये पळवून घेऊन जात होता. त्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी पंजाबवरुन आलेल्या मुलाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले होते.

यापूर्वीही झाली भेट

पंजाबवरून येऊन मुलीला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारा हा मुलगा यापुर्वी एकदा परतवाड्यात मुलीला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर 14 जूनला आला व मुलीला घेवून जात असताना नागपूर आरपीएफने पकडले. त्याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याचे परतवाड्याचे ठाणेदार संतोष टाले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...