आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 सप्टेंबरला घेणार पदभार:पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभार डॉ. दिलीप मालखेडेंकडे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनापासून पुढील आदेशापर्यंत हा पदभार सांभाळावा, असे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशात म्हटले आहे.

अकोला येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या वयाची 65 वर्षे उद्या, रविवार 4 सप्टेंबर रोजी पूर्ण होत असल्याने वयोमानपरत्वे ते निवृत्त होत आहेत. परंपरेनुसार तत्पूर्वीच नव्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे नव्या कुलगुरुंची निवड होईपर्यंत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे कुलपतींनी त्यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मावळते कुलगुरु डॉ. विलास भाले हे एक नामवंत कृषीतज्ज्ञ आहेत. त्यांनी 23 सप्टेंबर 2017 रोजी त्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली होती. तत्पूर्वी ते त्याच विद्यापीठात एक वरिष्ठ अधिकारी-संशोधक होते. सर्वसाधारणपणे त्यांची निवडही पाच वर्षांसाठीची होती. परंतु तत्पूर्वीच त्यांच्या वयाची 65 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना हे पद 18 दिवस आधी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी सोडावे लागत आहे. शिक्षण क्षेत्रात निवृत्तीचे वय फार तर 62 वर्षे असते. दरम्यान विशिष्ट जबाबदारी सांभाळणाऱ्या तज्ज्ञांना त्यानंतर तीन वर्षाची मुदतवाढ दिली जाते. अशाप्रकारे वयाची पासष्टी गाठणाऱ्यांना मात्र त्यानंतर त्या पदावर राहता येत नाही. डॉ. भाले यांची निवृत्ती ही याच सूत्रानुसार झाली आहे.

नव्या कुलगुरुसाठी पाच नावे चर्चेत

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पाच तज्ज्ञांची नावे चर्चेत आहेत. मुळात ही सर्व नावे गोपनीय असून ती राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. परंतु अद्याप त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले नाही. मुलाखतीअंती राज्यपाल यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

डॉ. भाले यांच्याकडेही होता अतिरिक्त प्रभार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात डॉ. दिलीप मालखेडे यांची निवड होण्यापूर्वी सुमारे चार महिने डॉ. विलास भाले यांच्याकडे कुलगुरुपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपण्याच्यावेळीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यावेळी डॉ. विलास भाले यांना अकोल्यासोबतच अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागला होता. आता नेमके उलट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...