आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटच्या पुरबची आजारावर मात:डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे टीबी, सिकलसेल, कुपोषणापासून झाली सुटका

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकलसेल, क्षयरोग आणि कुपोषण अशा विचित्र कचाट्यात अडकलेला मेळघाटमधील आदिवासी बालक, पुरब दिलीप भिलावेकर याला सदर गुंतागुंतीतून सहिसलामत बाहेर काढण्यात आले आहे. आदिवासी-कोरकू भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न करुन त्या लहानग्याला जीवदान दिले. आश्चर्यजनक बाब म्हणजे सदर बालकाच्या कुटुंबीयांवर रुढी-परंपरांचा प्रचंड पगडा असल्यामुळे ते उपचार करू देण्यास तयार नव्हते. परंतु डॉक्टरांनी त्यांनी योग्यरित्या समजूत घालून हे दिव्य कार्य पूर्णत्वास नेले.

धारणी तालुक्यातील मोगर्दा येथील रहिवासी दिलीप भिलावेकर यांचा दोन वर्षे सात महिने वयाचा मुलगा, पुरब हा जन्मताच कुपोषणाने ग्रासला होता. त्यातच त्याला सिकलसेल व क्षयरोगानेही गाठले. त्यामुळे त्याची रोग प्रतिकारक शक्ती अगदी क्षीण झाली होती. अशा स्थितीत त्याच्यावर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते. परंतु परंपरांचा पगडा असल्यामुळे त्याचे आई-वडिल त्याच्यावर वैद्यकीय उपचार करू देण्यास तयार नव्हते.

तरीही तेथील डॉक्टरांनी सततचा पाठपुरावा करून कमी वजन व इतर आजारांमुळे त्याच्या भविष्यावर कसा दुष्परिणाम होईल, हे त्यांच्या गळी उतरविले आणि एकदाचे पुरबला धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले.

टी.बी.बाबत तपासणी

अंगावर सूज, पोटामध्ये पाणी आणि हिमोग्लोबिनची अत्यंत कमी मात्रा अशी त्याची दाखल करून घेतले, त्यावेळची स्थिती होती. शिवाय वैद्यकीय तपासणीअंती तो सिकलसेलचा वाहकही दिसून आला. म्हणून त्याला एक बॉटल रक्त देण्यात आले. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. परंतु काही दिवसांतच पुन्हा त्याला सर्दी, खोकला, तापाचा त्रास झाला. त्यामुळे गावानजिकच्या बिजूधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करुन घेण्यात आले. याठिकाणी डॉ. सचिन राठोड यांनी त्याच्यावर उपचार केला. परंतु पुरबची प्रकृती व वजनामध्ये पाहिजे तशी सुधारणा होत नसल्याने टी.बी.बाबत तपासणी करण्यात आली व त्याला टीबी असल्याचेही निदान झाले.

सिकल सेल आजारावर मात

हा डॉक्टर्स व त्याच्या कुटुंबियांसाठी दुसरा धक्का होता. परंतु कुटुंबियांनी धीर देत त्याला येथील क्षयरोग रुग्णालयात आणण्यात आले. औषधोपचारानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे व वजनात वाढ झाल्याचे आढळून आले. सध्या त्याला टी. बी. विरोधी औषध चालू असून पुरबचे वजन साधारण श्रेणी मध्ये आलेले आहे. अशाप्रकारे पुरबने टी बी, कुपोषण व सिकल सेल आजारावर मात केली आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. जावरकर, धारणी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे आणि डॉ. सचिन राठोड यांनी सतत लक्ष घालून पुरबच्या उपचारांचा पाठपुरावा केला.

बातम्या आणखी आहेत...