आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारी झाली आहे. बी-बियाणे, खत खरेदीसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी करुन ठेवली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी सुरूवातीला वर्तवला होता. मात्र, अजूनही मान्सूनचा पाऊस आला नाही. त्यामुळे पेरणीपूर्व तयारी होऊन आता शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान आतापर्यंत सोयाबीनचे ८ हजार क्विंटल, कपाशीच्या १ लाख २० हजार पाकिटांची तर ८ हजार मेट्रिक टन खतांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामात यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र २ लाख ६२ हजार हेक्टर तर कपाशीचे २ लाख ३५ हजार हेक्टर राहणार आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर असल्याचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व मशागत आटोपली आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस अजूनही जिल्ह्यात आलेला नाही. सध्या ढगाळ वातावरण व अधूनमधून दिवसभरात पावसाचा एखादा हलका शिरवा येतो आहे मात्र पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कृषी हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १९ जूनपूर्वी मान्सूनचा पाऊस येणार नाही. १९ जूनपासून पाऊस आला तरी किमान ८० ते ९० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही पेरण्या जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असा अंदाज आहे. ‘
शेतकऱ्यांकडून आतापर्यंत खतांची ८ हजार मेट्रिक टन खरेदी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी सीड्सचे १ लाख ९८ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी असून, पहिल्या टप्प्यात ६० हजार क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार क्विंटलची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच कपाशीच्या ११ लाख ७५ हजार पाकिटांची मागणी असून ७.५० लाख पाकीट विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यापैकी आतापर्यंत १.२० लाख पाकीट शेतकऱ्यांनी खरेदी केले आहेत. तसेच खताची संपूर्ण खरीप हंगामासाठी १ लाख १४ हजार मेट्रिक टनाची मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात ४८ हजार मेट्रिक टन उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत ८ हजार मेट्रिक टनाची शेतकऱ्यांनी खरेदी केली असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांनी सांगितले आहे.
१५ जुलैपर्यंत करता येईल सोयाबीनची पेरणी ^यंदा पाऊस लवकर येणार असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता, मात्र तसे झाले नाही. दरम्यान मुबलक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशीची पेरणी करु नये. सोयाबीनची १५ जुलैपर्यंत पेरणी करु शकतो. अनिल खर्चान, कृषी अधीक्षक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.