आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Questioning Rulers Rather Than Praising Them Is True Journalism | Opinion Of Paranjoy Guha Thakurta Of Delhi, Workshop For Journalists At University

गुणगान करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हीच खरी पत्रकारिता:दिल्लीचे परणजॉय गुहा ठाकुरता यांचे मत

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधाऱ्यांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारुन आपल्या जबाबदारीचे भान करुन देणे, हीच खरी पत्रकारिता असल्याचे मत दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार परणजॉय गुहा ठाकुरता यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवारी विद्यापीठाच्या के. जी. देशमुख सभागृहात पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे होते. तर अन्य दोन वक्ते सकाळ वृत्तपत्र समूहाचे संपादक राहुल गडपाले आणि तरुण भारतच्या डिजीटल एडीशनचे संपादक शैलेष पांडे यांच्यासह दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे व अनिल अग्रवाल, प्र-कुलगुुरू डॉ. विजयकुमार चौबे अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

पत्रकारितेचा चेहरा बदलला

तीन सत्रात पार पडलेल्या कार्यशाळेचे बीजभाषण करताना ठाकुरता पुढे म्हणाले, भारतीय पत्रकारितेला फार मोठी उत्तुंग परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अलिकडच्या युगात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांनीही पत्रकारिता केली. परंतु त्यावेळचे उद्दीष्ट आणि आताचे उद्दीष्ट यात खूप मोठे अंतर आहे. सध्याच्या युगात पत्रकारितेचा चेहरा बदलला आहे. सुमार कामगिरी, भ्रष्ट व्यवहार असतानाही पत्रकार त्यावर कोरडे ओढू शकत नाहीत. सत्ताधाऱ्यांना त्यांच्या उणीवा दाखवू शकत नाही.

केंद्रीय यंत्रणांचा धाक

कोणते तरी एक सरकार केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून सरकारे उलथवून लावतात पण त्याबद्दलही सडेतोड बोलले जात नाही. उलट पत्रकारांच्या भूमिका बदलविल्या जातात, अशी सध्याची स्थिती आहे. देशात 1990 पूर्वी प्रसार माध्यमांची असलेली संख्या आणि आयएनएस तथा आरएनआयचा हवाला देत आता असलेली संख्या यातील लक्षणीय बदल तसेच कागद ते स्क्रीन असे वाचनाचे बदलते स्वरुप याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांच्या मते व्हाटस्अॅप, फेसबुक, ट्विटर ही समाजमाध्यमे सोशल मीडियाची साधने असली तरी आपण त्याच्या आहारी जातो आहोत का, आपल्याला एकप्रकारची त्या साधनांची नशा चढली आहे का, यावर विचार करण्याची गरज आहे.

भविष्य या विषयाची मांडणी

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात राहुल गडपाले यांनी पत्रकारिता आणि वृत्तपत्रांची धोरणे तसेच तिसऱ्या सत्रात शैलेष पांडे यांनी डिजीटल मीडिया आणि भविष्य या विषयाची मांडणी केली. प्रास्ताविक विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. सत्रनिहाय संचालन डॉ. चंदू सोजतिया, रवींद्र लाखोडे व डॉ. कुमार बोबडे यांनी केले. तर सत्रनिहाय वक्त्यांचा परिचय अनिल अग्रवाल, गिरीश शेरेकर यांनी करुन दिला. आभार गोपाल हरणे आणि प्राचार्य डॉ. राव यांनी मानले. अमरावती विद्यापीठ क्षेत्रातील अनेक पत्रकार, दोन्ही संघांचे सदस्य, पत्रकारितेचे विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...