आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा हवालदिल:लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांवर ‘बरसला’ कहर; पिकांवरही संकट

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या दोन वर्षात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस

गेल्या दोन वर्षात प्रत्येक महिन्यात हजेरी लावणारा पाऊस अद्यापही उसंत घ्यायला तयार नाही. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली असतानाच शुक्रवारी (दि. १२) उशीरा सायंकाळी शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सलग हजेरी लावणाऱ्या पावसामुळे हरभरा उत्पादकांसह संत्रा व भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानाची फिरली लहर आणि शेतकऱ्यांवर ‘बरसला’ कहर अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

अमरावती जिल्ह्याचा काही भाग हा खारपाणपट्ट्यात मोडतो. त्यामुळे हरभरा हे त्या भागाचे मुख्य पीक आहे. अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, भातकुली या तालुक्यांमध्ये खारपाणपट्टा आहे. याशिवाय वरुड, मोर्शी तालुक्यातही हरभऱ्याचे पीक घेतले जाते. यावर्षी साधारणत: हरभरा आणि त्याच्या जोडीला गहू अशा संयुक्त रब्बी पिकांनी १० हजाराहून अधिक जमीन व्यापली आहे. पण ढगाळ वातावरण आणि लहरी पाऊस यामुळे हरभरा अडचणीत आला आहे. पुर्वी वादाचा विषय असलेला हवामान बदल आता सर्वमान्य झालेला आहे. त्याच्या बदलाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. जगभरातील वातावरणात बदल होत आहेत. भारतात गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.

मागील दोन-तीन वर्षांचा विचार करता जानेवारी ते डिसेंबर असा एकही महिना नाही, ज्यामध्ये ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडला नाही. प्रत्येक महिन्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस, कधी गारपिट, कधी वादळ असतेच आणि ढगाळ वातावरण तर कमी-जास्त प्रमाणात बाराही महिने पहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘वेस्टर्न डिस्टर्बंस’ म्हणजेच पश्चिमी चक्रवात हिमालयावर अनेकदा आणि तेही प्रभावी रूपात यायला लागले आहे.

त्यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण प्रभावीत होत आहे, तसेच एकाचवेळी सक्रिय असलेला पश्चिमी चक्रवात आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, चक्राकार वारे यांच्या प्रभावामुळे पाऊस, गारपीट होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे सततच्या ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे विविध पीकांवर बुरशीजन्य तसेच विषाणूजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे फळपीक संत्रा आहे. वातावरणातील सततच्या लहरी बदलांमुळे हे पीक प्रचंड संकटात आले आहे. संत्र्यावर अनेक अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर फळगळ, निकृष्ट दर्जाची फळे येणे, झाडांची साल गळणे, झाडे अचानक निरुपयोगी होणे आदी प्रकार सार्वत्रिक झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

पावसाची शक्यता नाकारता येत नाही
कच्छ, सौराष्ट्रमध्ये अचानक आलेली उष्णतेची लाट तसेच छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर केरळ असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या सर्व बदलामुळे शुक्रवारी पावसाने हजेरी जावली. पुढील पाच दिवस विदर्भात वातावरण कोरडे राहील. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे किरकोळ प्रमाणात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. रविवारनंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. -प्रा. अनिल बंड, हवामान अभ्यासक.

पावसामुळे शेतकरी सापडतोय संकटात
सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाची कापणी होवून पिक उघड्यावर पडले आहे. खरिपानंतर आता ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बीतही हरभऱ्याचा दाणा काळा पडण्याची शक्यता नाकरता येत नाही. वारंवार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. -श्रीजीत ठाकरे, शेतकरी, गोळेगाव.

फळपिकांसह भाजीपाल्यावरही झाला परिणाम
वारंवार हजेरी लावणारा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे संत्रा, मोसंबीसह अन्य फळ पिके आणि भाजीपाला पिकांवरही परिणाम होत आहे. बुरशीजन्य रोगांमध्ये वाढ झाली आहे. आंब्याचा बहरदेखील गळू लागला आहे. लहरी हवामानात भाजीपाल्याचेही नुकसान होते. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आधीच गमावला गेला. त्यामुळे रब्बीच्या हरभऱ्यापासून त्यांना अपेक्षा होती. सध्याच्या वातावरणामुळे तिही संपुष्टात आली.

कृषितज्ज्ञांचे आवाहन
वारंवार होणाऱ्या हवामान बदलाचे परिणाम भोगावे लागू नये, यासाठी विकासाच्या नावावर होणारी वृक्षतोड व जंगलतोड थांबवणे आवश्यक आहे. तोडलेल्या झाडांची झीज भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. विविध कारखाने, तसेच पॉवर प्लांटमध्ये होणारा कोळशांचा तसेच डिझेल व पेट्रोलयुक्त वाहनांचा वापर कमीत कमी व्हायला हवा. कारण त्यामुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शोषूण घेण्यासाठीही झाडांची आवश्यकता आहे, असे आवाहन कृषि तज्ञांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...