आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या साधारण दहा ते बारा वर्षांत यंदा प्रथमच एप्रिल महिन्यातील ९ दिवसांत जिल्ह्यात साधारण ६७ मिमी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तब्बल ३२०० हेक्टर शेतजमिनीवरील पिके नष्ट झाली असून, १३ गोठ्यांसह २,१०५ इमारतींची पडझड झाली. यापैकी २५ एप्रिलपर्यंतच्या नुकसानासाठी जिल्हा प्रशासनाने २ कोटी ४९ लाख ८ हजार ६६० रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.
गेल्या चार दिवसांतील सलग पावसामुळे झालेले नुकसान अद्याप निश्चित व्हायचे असल्याने या मागणीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळा असताना गेल्या महिन्यात अचानक वातावरणात बदल झाला. हा बदल हवामान खात्यातर्फे वेळोवेळी कळवण्यातही आला. परंतु शेतातील उभी पिके, बाजारात मोठ्या प्रमाणात तोलाई करुन ठेवलेले अन्न-धान्य आणि इतर चीजवस्तू अगदी वेळेवर स्थलांतरीत करणे शक्य न झाल्याने सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना वादळी पावसाचा फटका सहन करावा लागला.
सध्या बहुतेक शेतांमध्ये उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो, मिरची, कोहळे आदी भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा अशी फळपिके आहेत. या सर्व पिकांना वादळी पावसाचा फटका बसला. काही भागात तर नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतजमिनीचे पोतही बिघडले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. अगदी पहिल्या दिवशी प्राथमिक अंदाज आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे अंतीम अहवाल तयार करण्यात आला.
त्यामुळे यंत्रणेला सध्या पावसाची मोजदाद, आवश्यक तेथे आपत्ती व्यवस्थापन आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे याच कामांना प्राथमिकता द्यावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या अहवालानुसार एप्रिल महिन्यात पावसाची पहिली नोंद ७ तारखेला घेण्यात आली. अर्थात तो त्या दिवशीच्या २४ तासांतील पाऊस असल्याने प्रत्यक्षात ६ एप्रिल रोजी अमरावतीत पहिला पाऊस पडला.
त्यानंतर ९ एप्रिल, १८ एप्रिल, १९ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २७ एप्रिल, २९ एप्रिल आणि ३० एप्रिलला पाऊस कोसळला. अशाप्रकारे एप्रिल महिन्यात तब्बल नऊ दिवस पावसाने हजेरी लावली. या प्रत्येक दिवशी काही भागात पडझड झाली. तर काही भागात शेतिपिकांना पावसाचा फटका बसला. दरम्यान, आतापर्यंतच्या मागणीपैकी १ कोटी १४ लाख ६९ हजार रुपये पडझडग्रस्तांना द्यावे लागणार असून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे
असे आहे महिनाभरातील नुकसान
६ एप्रिल ३०१ ८८४.७९ हे. १,६१,४६,१६० ९ एप्रिल २ -- १,११,० ०० १८ एप्रिल ३ -- १,२८,०० ० १९ एप्रिल ३५५ -- ८५,१० ,५०० २४ एप्रिल २ -- १३,००० २५ एप्रिल १८७ ९२ हे. -- २७ एप्रिल १५७ ६४.४१ हे. -- २९ एप्रिल ९१९ ११५३.९४ हे. -- ३० एप्रिल १७९ १३२१.९ हे. -- एकूण २,१०५ ३,५१७.०४ हे. २,४९,०८,६६०
...तर मागणीत पुन्हा वाढ
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोठे-ना-कोठे पाऊस कोसळत असल्याने त्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार व्हायचा आहे. तो झाल्यानंतर त्या नुकसानीची मागणीही राज्य सरकारकडे नोंदवली जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्याच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून हातात आलेली पिकेही खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
7 एप्रिलपर्यंतची मदत पोहोचली
अवेळी आलेला पाऊस व वादळामुळे शेतीपिकांसह इमारतींची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करुन तत्काळ अंतिम अहवाल तयार केला. यापैकी बहुतेक अहवाल शासनाकडे पोचले असून ७ एप्रिलपर्यंतच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची रक्कमही संबंधितांच्या खात्यात थेट मंत्रालयातून वळती करण्यात आली आहे. उर्वरित काळातील नुकसानापोटीचे अनुदानही लवकरच दिले जाईल.
-डॉ. विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.
अशी आहे नऊ दिवसांची पावसाची आकडेवारी
३० एप्रिल ४.३ मिमी. २९ एप्रिल २८.८ मिमी. २७ एप्रिल ०.८ मिमी. २५ एप्रिल ४.०० मिमी. २४ एप्रिल ०.७ मिमी. १९ एप्रिल १२.०४ मिमी. १८ एप्रिल ०.६ मिमी. ९ एप्रिल 0.9 मिमी ६ एप्रिल 14.2 मिमी
मे महिन्याची सुरूवातही पावसानेच
एप्रिलनंतर किमान मे महिन्यात तरी उन्हाळ्याचे उन पडेल, असे वाटले होते. परंतु एक मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभारंभाला अर्थात ३० एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसाही पाऊस होताच. त्यानंतर मंगळवार, २ मे आणि आज, बुधवार, ३ मे रोजीही सकाळी पावसाने दर्शन दिले. दुपारनंतर पडलेल्या उन्हाने रस्ते कोरडे झाले. परंतु वातावरणातील गारवा कायमच होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.