आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी:इमारत दुर्घटनाप्रकरणी राजेंद्र लॉजचा मालक राहुल जैनला अटक ; दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे उघड

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपूर्वी शहरातील प्रभात चौकातील इमारत कोसळून पाच जणांचा बळी गेला. या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक झाली होती. दरम्यान, वर्षभरापूर्वी राजेंद्र लॉजची इमारत पाडली मात्र त्या इमारतीचा मलबा न उचलता वरच ठेवला होता, त्यामुळे मलब्यातून पाणी भितिंत झिरपले, ते एक कारणसुद्धा रविवारी झालेल्या इमारत दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्यामुळे कोतवाली पोलिसांनी राजेंद्र लॉजचा मालक राहुल जैनला शुक्रवारी (दि. ४) उशिरा रात्री अटक केली आहे. राहुल राजेंद्र जैन (४१, रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती) असे लॉजच्या मालकाचे नाव आहे. मनपाने लॉजची इमारत शिकस्त असल्याची नोटीस दिल्यामुळे मागील वर्षी लॉजच्या ताब्यात असलेली वरची इमारत पाडली. या इमारतीच्या खालील बाजूला पाच दुकान होती. ती मात्र पाडली नव्हती. दरम्यान, जैनने वर्षभरापूर्वी इमारत पाडली मात्र इमारतीचा बहुतांश मलबा पहिल्या माळ्यावर पडून होता. यंदा अतिवृष्टी झाली. या मलब्यामुळे पाणी दुकानांच्या भिंतीत मुरले तसेच राजेंद्र लॉजची इमारत पाडताना दुकानांच्या स्लॅबसह इतरही भिंतींना नुकसान झाले, असे पोलिसांनी चौकशीदरम्यान घेतलेल्या जबाबामधून समोर आले.

तसेच याच प्रकरणात शुक्रवारी सायंकाळी याच घटनेतील मृत रवी परमार यांच्या पत्नी शिल्पी परमार यांनीसुद्धा जबाब नोंदवला होता. त्यांनीही या घटनेला इतर दोषींसोबत राजेंद्र लॉजचा मालक दोषी असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी राहुल जैनला शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती कोतवालीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलिमा आरज यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...