आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वहिवाट बंद झाल्याने शेतकरी प्रभावित:समृद्धी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांविरोधात ‘रास्ता रोको’, 5 जानेवारीला आंदोलन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वहिवाट रोखणाऱ्या समृद्धी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांविरोधात ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. वहिवाट बंद केल्याने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी हा इशारा दिला असून आगामी 5 जानेवारी रोजी आंदोलन केले जाईल, असे इशारापत्रात म्हटले आहे. त्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नोटीसही जारी करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापुरनजिकच्या तळेगाव (गावनेर) शिवारातील वहिवाटीचा रस्ता यंत्रणेने बंद केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत असून त्यांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. ही कदाचित तात्पुरती बाब असावी म्हणून प्रारंभी शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आठवडा लोटल्यानंतरही वहिवाट मोकळी न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट पोलिसात तक्रार नोंदवून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुळात रस्ता बंद करता येत नाही, असे लेखी पत्र खुद्द महामार्ग प्राधिकरणनेच दिले आहे. शेतकरी नेते तथा किसान सभेचे पदाधिकारी उमेश बनसोड यांनी माहितीच्या अधिकारात मागणी केली असता संबंधितांनी त्यांना हे उत्तर पुरवले होते. त्याचा आधार घेत बनसोड यांच्यासह त्या भागातील शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार नोंदवून रस्ता बंद करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. परंतु तसे करणे हे आमच्या अधिकारक्षेत्रात नाही, असे सांगत पोलिसांनी त्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न कायमच असून त्यामुळेच त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना दिली पत्रे

ज्या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आला, त्याचठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल, असे उमेश बनसोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या इशारापत्रात नमूद आहे. या पत्राच्या प्रती समृद्धी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह तहसिलदार, ठाणेदार व जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...