आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू तलवारीसह 10 ते 15 जणांचा शाळेत धुडगूस:हटकणाऱ्या शिक्षकांना मारण्याचा प्रयत्न; गणेशदास राठी विद्यालयातील प्रकार

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री गणेशदास राठी विद्यालयात दहा ते पंधरा जणांनी हातात चाकू व तलवार घेऊन धुडगूस घातला. धुडघुस घालणाऱ्या टोळक्याला शाळेत उपस्थित शिक्षकांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता, या टोळक्यातील काही जणांनी शिक्षकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा गंभीर प्रकार बुधवारी (ता. 24) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास घडला.

याप्रकरणी शाळेतील शिक्षकांनी बुधवारीच गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू केला आहे.

शाळा सुटताच घुसखोरी

बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शाळा सुटली. त्यावेळी तीन दुचाकीवर पाच ते सहा जण शाळेच्या प्रवेशद्वारातून थेट आतमध्ये आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी शाळेत आलेल्या दुचाकी वरील तरुणांनी शाळेच्या मैदानातच दुचाकीद्वारे स्टंटबाजी सुरू केली. त्यामुळे शिक्षकांनी त्यांना हटकले व बाहेर निघून जाण्यास सांगितले. ते दुचाकी घेऊन निघून गेले, मात्र काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलवले.

चाकू घेत शिक्षकाच्या मागे धावले

हातात चाकू, तलवार घेऊन दहा ते पंधरा जणांचे टोळके शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. त्यावेळी शिक्षक स्टाफरूममध्ये बसले होते. शिक्षकांना हा प्रकार लक्षात आल्यामुळे शिक्षकांनी या टोळक्याला हटकले असता, त्या टोळक्यातील काही तरुण दोन शिक्षकांच्या मागे हातात चाकू घेवून मारण्यासाठी धावायला लागले. त्यावेळी शिक्षकांनी कसाबसा स्वतःचा बचाव करून घेतला.

मुख्यध्यापकांची ठाण्यात धाव

काही वेळानंतर हे टोळक शाळेतून निघून गेले, मात्र झालेल्या धक्कादायक प्रकाराबाबत शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. पाचंगे यांच्यासह ईतर शिक्षकांनी गाडगे नगर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान गाडगेनगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तक्रार प्राप्त होताच, धुडगूस घालणाऱ्यांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तिघांना ताब्यात घेतले

''गणेशदास राठी विद्यालयात दहा ते पंधरा जण हातात चाकू घेऊन आले व शिक्षकांना मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार प्राप्त झाली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरनी तिघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. - आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर.

बातम्या आणखी आहेत...