आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. या महिन्यापासून त्यांचे रेशन बंद करण्यात आले असून त्याऐवजी प्रतिव्यक्ती दरमहा १५० रुपये दिले जाणार आहे. दीडशे रुपये महिना म्हणजेच पाच रुपये रोज या सूत्रानुसार ३ लाख ८१ हजार ८६२ शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे. या अफलातून निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील गृहिणी प्रचंड नाराज झाल्या असून, पाच रुपयात रोजची शिधा मिळणार कुठे ? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक घरातील ‘किचन बजेट’ पूर्णत: विस्कळीत होणार आहे. तोकड्या प्रमाणात का असेना परंतु धान्य मिळतेय, म्हणून जेवण तयार होईल, याची आम्हाला खात्री होती. उद्या बोटावर मोजण्याइतपत रकमेत धान्य आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला असून ही रक्कम काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या कुणी माराव्या, असे महिला विचारत आहेत. तर तिकडे कमीशन घटणार असल्यामुळे रेशन दुकानदारांनीही या निर्णयाचा निषेध केला असून त्याविरोधात १६ व २२ मार्च रोजी दिल्लीत मोर्चा काढला जाणार आहे.
प्रतिव्यक्ती दीडशे रुपये जमा करु
आतापर्यंत शेतकरी कुटुंबाला प्रतिव्यक्ती एक किलो गहू आणि चार किलो तांदुळ असे वितरण केले जात होते. आता तेही बंद झाले आहे. त्याऐवजी प्रतिव्यक्ती दरमहा दीडशे रुपये (अर्थात दररोज पाच रुपये) एवढी रक्कम संबंधित कार्डधारकाला दिली जाणार आहे. यासाठी त्या कुटुंबातील महिलेच्या नावे बँकेत खाते उघडावे लागणार असून, त्या खात्यातच ही रक्कम वळती केली जाणार आहे. -डी. के. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती.
२०१८ चा निर्णय हाणून पाडला
रेशन वितरण प्रणालीतील उणीवा दूर करणे शक्य नसल्याने हळूहळू ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा घाट आहे. त्यामुळे २०१८ सालीच लागू होणारा हा निर्णय आम्ही सतत आंदोलने करुन हाणून पाडला होता. मात्र, आता पुन्हा तोच मुद्दा सरकारने लादल्यामुळे २२ मार्च रोजी दिल्लीत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात संघटनेचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधूही सहभागी होणार आहेत. -राजेश आंबुसकर, प्रदेश उपाध्यक्ष, रेशन दुकानदार महासंघ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.