आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषराणा-कडू वाद A To Z:रवी राणा - बच्चू कडूंच्या वादाचा अथ ते इतिपर्यंतचा एपिसोड, वाचा संपूर्ण...

विश्वास कोलते24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारसोबत असलेल्या पण सरकारमधील एकाही पक्षाच्या नसलेल्या दोन आमदारांमधील वाद सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. यापैकी एक आमदार आहेत प्रहारचे नेते बच्चू कडू आणि दुसरे आहेत अपक्ष आमदार रवी राणा. यापैकी आमदार रवी राणा हे भाजपचे मित्र आहेत तर बच्चू कडू हे शिंदे गटाचे मित्र आहेत.

या दोघांतील वाद इतक्या टोकाला गेला आहे की आता यात तलवार आणि कोथळा काढण्यापर्यंतची भाषा वापरली गेली आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही दोघांमधील विखारी वक्तव्यांची मालिका थांबत नाहीये.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा वाद नेमका कुठून सुरू झाला आणि यात आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या हे आपण समजावून घेऊया...

'गोड' फराळ वाटपाने 'कडू' वादाला फुटले तोंड

रवी राणा-बच्चू कडूंतील सध्याच्या वादाला दुर्दैवाने निमित्त ठरले आहे दिवाळीच्या गोड फराळाचे. त्याचे झाले असे की, आमदार रवी राणा हे दरवर्षी दिवाळीपूर्वी अमरावतीतील गरीब कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करतात. राणा दाम्पत्याकडून दरवर्षी नियमितपणे हा उपक्रम राबवला जातो. यंदा रवी राणा यांनी बच्चू कडूंचे मूळ गाव असलेल्या बेलोरा या गावात जाऊन किराणा वाटप केले.

रवी राणांकडून दरवर्षी गरीब कुटुंबांना दिवाळीत किराणा वाटप केले जाते.
रवी राणांकडून दरवर्षी गरीब कुटुंबांना दिवाळीत किराणा वाटप केले जाते.
यंदा रवी राणांनी 1 लाख गरीब कुटुंबांना दिवाळी किराणा वाटप केले.
यंदा रवी राणांनी 1 लाख गरीब कुटुंबांना दिवाळी किराणा वाटप केले.

बच्चू कडूंकडून 'खिसे कापणारे' म्हणत टीका

यानंतर बच्चू कडूंनी रवी राणांचे नाव न घेता या किराणा वाटपावर टीका केली होती. आम्ही निवडणुकीची तयारी करतो तेव्हा रक्तदान करून अर्ज भरतो. पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे कमी नाही अशी टीका बच्चू कडूंनी केली होती.

मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही - राणांचे प्रत्युत्तर

बच्चू कडूंच्या या टीकेमुळेच वादाला तोंड फुटले. यावर गप्प राहतील ते राणा कसले? मग राणांनी याला प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की, मी धोका देऊन, खोका घेऊन गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू केवळ तोडपाण्यासाठीच आंदोलन करतात. तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे अशी टीका राणांनी केली होती.

राणांच्या टीकेनंतर बच्चू कडू आक्रमक

राणांनी गुवाहाटीला जाण्यावरून टीका केल्यानंतर मात्र बच्चू कडूंनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत याचे पुरावे द्यावे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली. हा काही माझ्या एकट्यावरील आरोप नसून गुवाहाटीला जाणाऱ्या सर्वच आमदारांवरील आरोप आहे. सर्वच आमदार पैशांसाठी गुवाहाटीला गेले होते असा अर्थ याचा होतो असेही बच्चू कडू यानंतर म्हणाले.

रवी राणा हे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात.
रवी राणा हे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात.

बच्चू कडूंचा थेट फडणवीसांवरच प्रहार

50 आमदारांना खरच "खोके' दिले का, हे आता शिंदे-फडणवीसांनीच स्पष्ट करावे; अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. आमदार रवी राणांवर कारवाई नाही केली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस देणार आणि सात ते आठ आमदार आमची भूमिका जाहीर करू असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला.

गुलाबराव पाटलांचे बच्चू कडूंना समर्थन

बच्चू कडूंच्या या भूमिकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनीही समर्थन दिले. अशा प्रकारचे आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे असे पाटील म्हणाले.

अल्टीमेटमला घाबरत नाही, फडणवीस माझे नेते - राणा

रवी राणांची अलिकडील काळातील भूमिका ही भाजपला पूरक राहिलेली आहे.
रवी राणांची अलिकडील काळातील भूमिका ही भाजपला पूरक राहिलेली आहे.

याला प्रत्युत्तर देताना रवी राणा म्हणाले की, बच्चू कडू काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. फडणवीस माझ्यासोबत असताना कोण काय अल्टिमेटम देते याकडे लक्ष देण्याची मला आवश्यकता नाही. तसेच, फडणवीस सोबत असल्यामुळे माझ्याविरोधात कोणी कितीही आंदोलने केले तरी मला त्याची पर्वा नाही असेही राणा म्हणाले होते.

कडू म्हणजे फुसका फटाका - राणा

दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे, अशी टीका आमदार रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर यानंतर केली.

टीकेवरून बच्चू कडूंवर गुन्ह्याचीही नोंद

रवी राणांसोबतच्या या शाब्दिक वादादरम्यान बच्चू कडूंवर अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद झाली. आमदार कडू यांनी आमदार राणांवर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे महिलांचा अवमान झाल्याची तक्रार महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी 28 ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्याविरुध्द कलम 501 अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता.

वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी

दोन्ही नेत्यांमधील वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात मध्यस्थी केली. शिंदे-फडणवीसांनी राणा आणि कडूंना मुंबईला बोलावून घेत रविवारी म्हणजेच 30 ऑक्टोबरला रात्री वर्षा या निवासस्थानी त्यांना समोरासमोर बसवून चर्चा घडवून आणली. मध्यरात्री उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचेही सूर थोडे नरम झाले. वर्षावरून बाहेर पडताना राणा उद्या सकाळी बोलतो असे म्हणाले, तर कडूंनी अमरावतीत जाऊन बोलणार अशी भूमिका घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतही राणा दाम्पत्याचे निकटचे संबंध आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतही राणा दाम्पत्याचे निकटचे संबंध आहेत.

राणांनी घेतले शब्द मागे

शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा यांनी आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र त्याचवेळी त्यांनी बच्चू कडूंनीही आपले शब्द मागे घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सरकारसोबत सरकारचा एक घटक असताना एकमेकांवरील टीकेसाठी वापरलेली भाषा न पटणारी होती असेही राणा म्हणाले होते.

राणांच्या माघारीनंतरही कडूंचा कोथळा काढण्याचा इशारा

राणांनी या वादा सोमवारीच माघार घेत शब्द मागे घेत असल्याचे म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबर रोजी बच्चू कडूंनी अमरावतीत कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना कडूंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी आमच्या वाट्याला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड माराल तर तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. सत्ता गेली चुलीत असे कडू यावेळी म्हणाले.

मंत्रिमंडळातून सत्ता पाहायची आहे - कडू

प्रहार हा आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही दिसायला कमी असलो तरी आमच्याजवळ बाजी, तानाजी आहेत. गुवाहाटीला गेलो ते केवळ विकासासाठी. मात्र, आम्ही पाठिंबा दिला तर बदनामी सुरू केली. आम्ही गांधीजींना मानतो, पण आमच्या डोक्यात भगतसिंग आहे असे कडू म्हणाले. आम्ही 15 वर्षे सत्ता बाहेरून पाहिली. आता मात्र मंत्रिमंडळातून सत्ता पाहायची आहे असेही कडू यावेळी म्हणाले.

आंदोलक नेता अशी बच्चू कडूंची प्रतिमा आहे.
आंदोलक नेता अशी बच्चू कडूंची प्रतिमा आहे.

कडूंच्या भूमिकेनंतर राणा पुन्हा आक्रमक

कार्यकर्ता मेळाव्यात बच्चू कडूंच्या कठोर भूमिकेनंतर आमदार रवी राणांनीही पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकवेळा नव्हे दहा वेळा झुकेल. परंतु कुणी दम देत असतील तर मी घरात घुसून मारायला कमी करणार नाही असे राणा म्हणाले. मंत्री बनणे न बनणे हा माझा अधिकार नाही. सीएम, डेप्टी सीएम यांचा आदर करून मी दोन पावले मागे आलो आणि दिलगीरी व्यक्त केली. कुणाचेही मन दुखवू नये म्हणून मी विषय संपवला. पण कुणी वारंवार दम देत असेल की, मी रवी राणांना माफ करणार नाही. मी म्हणतो तुम्हाला कुणी माफ करायला सांगितले. तुमच्यात जेवढी हिंमत असेल ती लावा ते कसे निवडून येतील ते बघा. वेळच सांगेल की, बच्चू कडू पुन्हा आमदार होतील की नाही असे राणा म्हणाले.

बच्चू कडूंचे मविआ नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.
बच्चू कडूंचे मविआ नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.

मी रक्त सांडून घ्यायला तयार - कडू

याला प्रत्युत्तर देताना कडू म्हणाले की, मी मेळाव्यात बोलताना राणांचे नाव घेतले नव्हते. कुणी वाट्याला गेलं तर कोथळा काढू असे म्हटले होते. आता त्यांनी हा विषय अंगावर ओढून घेणं हा त्यांचा विषय आहे. राहिला विषय घरी येऊन मारण्याचा तर मी तयार आहे. त्याने घरी यावं अथवा अन्य कुठे बोलवावं मी तिथे येतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिले. त्यांनी तलवार घेऊन यावं मी हार घेऊन येईन. त्यांना जो शरीराचा भाग कापायचा असेल तो कापावा. मी रक्त सांडून घ्यायला तयार आहे असे कडू म्हणाले.

सामान्यांसाठी लढणारा नेता अशी बच्चू कडूंची प्रतिमा आहे.
सामान्यांसाठी लढणारा नेता अशी बच्चू कडूंची प्रतिमा आहे.

पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दरम्यान, दोन्ही नेत्यांतला वाद पुन्हा उफाळल्याने या वादात आता पुन्हा एकदा मुखमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून मध्यस्थी केली जाणार असून त्यांची पुन्हा भेट घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकारण समजून घ्या...

बच्चू कडू आंदोलक ते दोन आमदारांचा पक्ष

बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघेही अमरावती जिल्ह्यातील वलय असलेले राजकीय नेते आहेत. यापैकी बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2004 पासून ते सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आंदोलक नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू 2019 पर्यंत अपक्ष आमदार म्हणून अचलपूरचे प्रतिनिधित्व करत होते. आता प्रहार जनशक्ती पक्षाचे ते आमदार आहे. प्रहारचे कडूंशिवाय राजकुमार पटेल हेही आणखी एक आमदार आहेत. ते 2019 च्या निवडणूकीत मेळघाट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आता प्रहारची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने बच्चू कडू अमरावतीत प्रयत्नशील आहेत. पुढच्या वेळेस प्रहारचे दहा आमदार निवडून आणू असेही कडू अमरावतीतील कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले होते.

रवी राणा तिसऱ्यांदा आमदार

दुसरीकडे रवी राणा हे अमरावतीतील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग तिसऱ्यांदा इथून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने त्या निवडून आल्या होत्या. 2014 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. पण या निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

मंत्रिपद, अन् पक्षविस्तार संघर्षाची वादाला किनार

नुकत्याच झालेल्या सत्तापालटापूर्वीच्या मविआ सरकारमध्ये बच्चू कडू हे मंत्री होते. तर रवी राणा हे भाजपला पुरक म्हणून भूमिका घेत राहिले. मविआ सरकारविरोधात राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाचेही आंदोलन केले. त्यामुळे राणा दाम्पत्य हे भाजपच्या जवळचे आहे. तर कडू हे शिवसेनेसोबत शिंदेंचे मित्र म्हणून सध्याच्या सरकारमध्ये आहे. विद्यमान सरकारमध्ये दोन्ही नेत्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जाते. याशिवाय आपापल्या पक्ष विस्तार संघर्षाचीही किनार या वादाला असल्याचे स्थानिक राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...