आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘एक अनार व सौ बिमार’ अशी स्थिती तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीसह आरक्षणामुळे झाली आहे. अर्थात ज्या प्रभागात दोन महिला उमेदवारांचे आरक्षण आहे, त्या ठिकाणी एका पुरुष उमेदवार पदासाठी रस्सीखेच असून प्रत्येक पक्षातून या एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवार पुढे येत आहेत. त्यामुळे नेमकी तिकीट कोणाला द्यायची अशा गहन पेचात सध्या भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा हे प्रमुख पक्ष अडकले आहेत. अशात बंडखोरी होण्याची दाट शक्यता असून, ऐनवेळी इकडे नाही तर तिकडे असे म्हणत पक्ष बदलही केला जाऊ शकतो. समजा अपेक्षित पक्षाने प्रवेश नाकारला तर अपक्ष लढण्याची तयारीही अनेकांनी केली आहे. त्यामुळेच यंदा मनपाच्या निवडणुकीत कधी नव्हे ती चांगलीच चुरस राहणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला फारसे कठिण नाही. मात्र गेल्या निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळी चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तिकडे शिवसेनेचे काही हुकमी उमेदवार त्यांच्या जागी व्यवस्थित असून त्यांच्या जागेला फारसा धोका नाही. तरीही ऐनवेळी मनपा निवडणुकीच्या राजकीय पटावर कोणती स्थित्यंतरे घडणार याचा काहीच नेम नाही. २०१७ च्या निवडणुकीत सत्ता मिळवणाऱ्या भाजपचीही यावेळी चांगलीच कसोटी आहे. येथे इच्छुक जास्त व जागा कमी अशी स्थिती आहे. गेल्यावेळी काही प्रभागांमधून यांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले होते. यावेळी १६ प्रभागांमध्ये एकालाच संधी मिळणार असल्यामुळे या पक्षातील बंडखोर इतर पक्षाच्या आश्रयाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भाजप युवा स्वाभिमानासाठी काही जागा सोडणार की, स्वबळावर लढणार याबाबतही सध्या शक्यतांची पडताळणीच सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी उमेदवाराची निवड ही सोपी राहिली नाही.
आघाडी, युतीची वाट मनपा निवडणुकीत आघाडी किंवा युती झाली तर आणखीनच परिस्थिती बिकट होणार आहे. कारण अशात प्रत्येक प्रभागात आघाडी व युतीचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असेल अशात रुसवे, फुगवे, बंडखोरीला ऊत आल्याशिवाय राहणार नाही. यात जो बंडखोरी करेल त्याच्यामुळे आघाडी किंवा युतीच्या उमेदवाराचे नुकसान होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.