आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:रिम्स हॉस्पिटलमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गोंधळ, डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप; राजा पेठ पोलिसात तक्रार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा मार्गावरील राजा पेठ हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी डॉक्टरांवर चुकीचा उपचार व हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत हॉस्पिटलमध्ये चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर राजा पेठ पोलिसांनी हॉस्पिटल गाठून नातेवाइकांची समजूत काढल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर नातेवाइकांनी राजा पेठ ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

दुर्गा संजय खंडारे (३८) रा. कुऱ्हा असे मृत महिलेचे नाव आहे. मूळच्या कुऱ्हा येथील रहिवासी दुर्गा खंडारे या दोन महिन्यांपासून शहरातील बिच्छुटेकडी परिसरात राहत होत्या. दुर्गा यांना मानेच्या मागील भागातील रक्तवाहिनीचा त्रास सुरू झाल्याने नातेवाइकांनी त्यांना ८ मे रोजी रिम्स हॉस्पिटलमध्ये भरती केले. विविध चाचण्या झाल्यानंतर ९ मे रोजी सकाळी दुर्गा खंडारे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुर्गा खंडारे या सायंकाळपर्यंत शुद्धीवर आल्या नाहीत. रक्तस्त्राव अधिक झाल्याने नातेवाइकांनी रक्ताची ही व्यवस्था केली.

मात्र, रात्री उशिरापर्यंत दुर्गा खंडारे शुद्धीवर न आल्यामुळे नातेवाइकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. त्यावर रुग्णाला शुद्धीवर येण्यास वेळ लागतो, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर दुर्गा यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांचा सिटी स्कॅन व एमआरआय सुद्धा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाच्या ब्रेनवर सुज असून धोका वाढला आहे, असे सांगितले.

दोन दिवस व्हेंटिलेटवर उपचार चालल्यानंतर बुधवारी सकाळी डॉक्टरांनी दुर्गा खंडारे यांना मृत घोषित केले. दुर्गा यांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाइकांनी एकच आक्रोश करून संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या उपचारामुळे दुर्गा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. संबंधित डॉक्टरवर कारवाई करा, अशी मागणी नातेवाइकांनी रेटून धरल्यामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलिसांनी रिम्स हॉस्पिटल गाठून नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर नातेवाइकांनी राजा पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...