आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन:पाणी शेतात पोहचेना म्हणून थेट कोरड्या कुंडीत उभे राहून संताप व्यक्त

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात आणखी वाढ झाली आहे. पण, या योजनेचे पाणी शेतातील कुंडीपर्यंत पोहचत नसल्याने गुरुवारी अनेक शेतकऱ्यांनी थेट कोरड्या कुंडीत उभे राहून संताप व्यक्त केला. या लक्षवेधी आंदोलनामुळे उपसा सिंचन योजनेच्या यंत्रणेत खळबळ माजली असून, अधिकाऱ्यांच्या पातळीवर तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गुरुकुंज उपसा योजना अंमलात आणली. या योजनेद्वारे शेतशिवारातून पाईपलाईन नेत पाणी वितरणासाठी कुंड्या तयार करण्यात आल्या. पाणी पुरवठ्याचे हे काम अलिकडेच पूर्णत्वास नेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सध्या शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज असतानाही शेतकऱ्यांच्या कुंड्यांपर्यंत पाणीच पोहचत नाही. त्यामुळे यंत्रणेविरुद्ध एकसंघ होत शेतकऱ्यांनी एकच आक्रोश व्यक्त केला. या योजनेतून शेतकऱ्यांना कुंड्या देण्यात आल्या. मात्र पाणी सोडण्याचे व ते पोहचविण्याचे नियोजन हे सपशेल अयशस्वी ठरले आहे.

गुरुवारी मोझरी व विचोरी येथील अनेक शेतकरी सिंचन योजनेच्या पाण्याच्य प्रतीक्षेत असताना काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी तर काही शेतकऱ्यांच्या कुंडीत पाण्याचा थेंबही आढळून आला नाही. युवा शेतकरी राहुल लांजेवार, बंडू चोपकर, सुखदेव पाटील, देवघरे आदी शेतकऱ्यांनी याबाबत जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले.

पाणी सोडण्याबाबत नियोजनात भेदभाव आढळून येत असल्याचा व सदर योजनेत पैशाची उधळपट्टी करून योजना पूर्ण करून शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. थेट शेतीच्या बांधावर पोहचून त्यांनी कुंडीत काही तासांपर्यंत उभे राहून पाण्यासाठी आक्रोश करीत या योजनेबाबत नाराजी व्यक्त केली.

नुकसान भरपाई द्यावी

सिंचन योजनेचे पाणी मिळणार म्हणून मी माझ्या शेतात हरभरा पेरला. उसणवार करून पेरणी केली. मात्र गेल्या एक महिन्यापासून पाण्याची प्रतीक्षा करीत असताना आज कुठे एका कुंडीत पाणी पोहोचले. त्यासाठी पहिल्यांदा कंत्राटदाराकडे तक्रार करावी लागली. त्यांनी आजूबाजूच्या शेतातील १२ कुंड्यातील पाणी बंद केल्यानंतर मला फक्त एका कुंडीत अनपेक्षित पाणी मिळाले आणि दोन कुंडीत काहीच नसल्याने माझ्या शेताचे नुकसान होत आहे. कंत्राटदार उडवाउडवीची उत्तरे देत आहे. शासनाने मला व ज्यांच्या शेतात पाणी पोहचत नाही अशा सर्वाना नुकसान भरपाई देण्यात यावी.

- राहुल लांजेवार, शेतकरी, मोझरी​​​​​​

बातम्या आणखी आहेत...