आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय तज्ञांचे मत:​​​​​​​रेमडेसिविर गुणकारी मात्र जादुई कांडी नाही;किडणी, लिव्हरवर होऊ शकतो साइड इफेक्ट

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनो पॅनिक होऊन इंजेक्शनचा आग्रह धरू नका
  • कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्यापासून 10 दिवसांत रेमडेसिविर परिणामकारक

सध्या कोरोनाने प्रचंड कहर केला आहे. जिल्ह्यात दररोज हजारांवर नव्या रुग्णांची संख्या आहे. त्यामुळे रुग्णालयात जागा नाही, गंभीर रुग्णांची संख्या ही भक्कम आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. मात्र, या इंजेक्शनची गरज कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला नसते. रेमडेसिविर नेमके किती गुणकारी आहे, त्याच्या वापराने खरंच रुग्णांला किती फायदा होतो, ते कधी व कसे वापरले जाते, त्याच्या वापराचे दुष्परिणाम काय, यासह रेमडेसिविरबाबत अनेक महत्वपूर्ण बाबी आम्ही शहरातील काही नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविरसाठी आग्रह न धरण्याचा सल्ला दिला आहे.

आवश्यकता असेल तर द्यावे रेमडेसिविर
तातडीचा उपचार म्हणून रेमडेसिविर कोरोना रुग्णांना देण्यात यावा, असे एफडीएचे निर्देश आहेत. माईल्ड सिम्टोमॅटिक व असिम्टोमॅटिक रुग्णांना रेमडेसिविर दिलेच पाहिजे असे नाही. रुग्ण जर अत्यवस्थ असेल, तर तातडीचा उपचार म्हणून याचा उपयोग केला जातो. सध्या परिस्थिती जीव वाचवण्याची आहे. त्यामुळे परिणाम की दुष्परिणाम हा विषय आता विचार करण्याचा नाही. रुग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. रुग्णाला आवश्यकता असेल रेमडेसिविर द्यावे. - डाॅ. सविता अप्तुरकर, समुदाय वैद्यकीय अधिकारी, सीसीसेंटर, धामणगाव रेल्वे.

सीटी स्कोर जास्त असेल तर रेमडेसिविर देतो
रेमडेसिविर ही कोविड १९ वरील औषध नाही. ते ब्राॅड स्पेक्ट्रम अॅन्टिबायोटिक आहे. रेमडेसिविर गरजेचेच आहे असे नाही. सीटी स्कॅनमध्ये काेरोना संसर्गाचा स्कोअर जास्त असेल तरच त्या रुग्णाला रेमडेसिविर देण्याचे निर्देश आहेत. हे स्टेयराॅइड नाही. हे इंजेक्शन सलाइनद्वारे दिले जाते. औषधीचा कोणता ना कोणता दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. रेमडेसिविर हे औषध यकृतासाठी घातक असून, कमी जास्त प्रमाणात यकृतावर दुष्परिणाम करते.- डाॅ. श्रीकांत फुटाणे, व्यवस्थापक जिल्हा कोविड रुग्णालय, अमरावती.

ती काही जादूई दवा नाही, कशाला धावपळ करता ?
रेमडेसिविर फायदेशीर जरुर आहे. परंतु जादूई दवा नाही. नागरिकांनी उगाच धावपळ करु नये. पूर्वी स्टेरॉइड आणि रेमडेसिविर या दोन्ही इंजेक्शन्सचा वापर केला जायचा. आता मात्र केवळ स्टेरॉइडनेही काम निभावले जातो. मी स्वत: कोविड रुग्णांवर उपचार करतो आहे. त्यामुळे मी याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो. माझ्या अनुभवानुसार कोविड रुग्णांसाठी रेमडेसिविर उपयोगी औषध जरुर आहे. परंतु ते मिळाले नाही तर फार मोठा अनर्थ घडेल, असेही नाही. स्टेरॉइड पर्यायी औषधांमुळे रुग्णाला स्थिर करण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजे. डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनीही त्यासाठी आग्रही असू नये. - डॉ. विजय बख्तार, सिनिअर हृदयरोग तज्ज्ञ.

मी आतापर्यंत एकाही रुग्णाला ‘रेमडेसिविर’ दिले नाही
रेमडेसिविरचा सहा इंजेक्शनचा डोस आहे. मात्र केवळ गंभीर रुग्णासाठीच त्याचा वापर करायला पाहिजे. कारण ते सुद्धा फार उपयोगाचे आहे, असे म्हणता येणार नाही. ज्यांना पूर्वीच किडणी आणि लिव्हरसंबधी आजार आहे, त्यांना तर रेमडेसिविरचे साइड इफेक्ट अधिक प्रमाणात जाणवू शकतात. अनेकदा रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाइकसुद्धा डॉक्टरांना रेमडेसिविर देण्याबाबत प्रचंड आग्रह करतात, तसेही व्हायला नको. रेमडेसिविरपेक्षाही स्टेरॉइड गुणकारी आहे, वास्तविकता सध्या तेच एक महत्वाचे शस्त्र आमच्याकडे (डॉक्टर) आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनीच स्टेरॉइडचे वापर करायला पाहिजे. आम्ही स्वत: आतापर्यंत एकाही रुग्णाला रेमडेसिविर वापरले नाही, आम्ही स्टेरॉइडच वापरतो. असे असले तरी रुग्णाची प्रकृती गंभीर असली तर स्टेरॉइड किंवा रेमडिसिव्हर देऊनही फायदा होत नाही. त्यामुळे रेमडेसिविरसाठी नातेवाइकांनी आग्रही राहू नये. - डाॅ. प्रफुल्ल कडू ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ.

रेमडेसिविरऐवजी स्टेरॉइड रुग्णाला दिले तरी चालेल
कोरोना लक्षणे सुरू झाल्यापासून १० दिवसांच्या आत रेमडेसिविर परिणामकारक कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्यापासून १० दिवसांच्या आत कोविड रुग्णासाठी रेमडेसिविर परिणामकारक आहे. ही जादूई औषधी नाही. विषाणू जे गुणाकाराच्या वेगाने वाढतात त्याला रेमडेसिविर रोखते. शरीरात जो कोरोना विषाणू गेला आहे तसेच त्याने जे नुकसान केले आहे, तेही रेमडेसिविर दिल्याने भरून निघत नाही. यामुळे रुग्ण वाचतोच, असे नाही. रुग्णाला १०० च्या वर ताप येत असेल, श्वसनास त्रास होत असेल तर रेमडेसिविर मदत करते. ज्यांना मूत्रपिंड किंवा यकृताचा त्रास आहे, अशा रुग्णांना रेमडेसिविर देणे धोकादायक ठरु शकते. - डाॅ. रवी भूषण, आरएमओ, जिल्हा कोविड रुग्णालय.

बातम्या आणखी आहेत...