आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप:शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर प्रसाधनगृह केवळ कर्मचाऱ्यांसाठीच

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात २९ पेट्रोल पंप असून त्यापैकी तीन पेट्रोलपंपावर प्रसाधनगृहच नाहीत, तर उर्वरित २६ पेट्रोलपंपांवर प्रसाधनगृहाची सुविधा असली तरी त्याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती नाही, कारण तेथे प्रसाधनगृह असल्याचे ठळक अक्षरात लिहिलेले फलकच नाहीत. काही ठिकाणी केवळ पुरुषांसाठी प्रसाधनगृह असून महिलांच्या प्रसाधनगृहांना कुलूप लावून ठेवल्याचे आढळले. दिव्य मराठीने प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रसाधनगृहांमध्ये अस्वच्छता आढळली तसेच ते केवळ तेथील कर्मचाऱ्यांच्याच वापरात असल्याचे दिसून आले.

शहरातील पेट्रोलपंप १२ तास आणि शहराबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरू असतात. त्यामुळे शहरात १२ तास आणि शहराबाहेर २४ तास प्रसाधनगृह सुरू असावे, असा नियम असल्याचे पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान एका (पुरुष व महिलांसाठी वेगवेगळ्या) प्रसाधनगृहाची सोय असणे अनिवार्य आहे.

जागेअभावी तीन पेट्रोल पंपांवर प्रसाधनगृह नाहीत
शहरातील तीन पेट्रोल पंपांवर जागेअभावी प्रसाधनगृह नाहीत. उर्वरित सर्वच ठिकाणी प्रसाधनगृह आहेत. फलकंही आहेत. परंतु, पेट्रोल पंपावरील प्रसाधनगृह केवळ ग्राहकांसाठी आहेत. ते सर्वसामान्यांसाठी नाहीत. सर्वसामान्यांनी त्याचा वापर केला तर ते पेट्रोल पंपासाठी अडचणीचे व त्रासदायक ठरू शकते.- सौरभ जगताप, सचिव, अमरावती पेट्रोल डीलर्स असो.

किमान एक प्रसाधनगृह असणे अनिवार्य
पेट्रोल पंपवर किमान एक प्रसाधनगृह (पुरुष व महिलांसाठी) असणे अनिवार्य आहे. पेट्रोल कंपनीच्या नियमांमध्येच त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे प्रसाधनगृह असणे बंधनकारक आहे. तसेच प्रसाधनगृह उपलब्ध असल्याचे ग्राहकांना कळावे यासाठी त्याचा ठळकपणे उल्लेखही असणे आवश्यक आहे. - भावेश सिंग, फिल्ड ऑफिसर, आयओसी, अमरावती.

प्रसाधनगृह असल्याचे माहितीही नसते
शहरातील पेट्रोलपंपावर प्रसाधनगृह असल्याचे ग्राहकांना माहितीही नसते. याबाबत जनजागृती व्हायला हवी. यामुळे सर्वसामान्यांची विशेषत: महिलांची कुचंबणा टळेल. काही पेट्रोल पंपावर अगदी मागे प्रसाधनगृह असतात. त्यामुळे ठळकपणे ते असल्याचे फलकही लावण्यात यावेत. तेव्हाच तिथवर पोहोचता येईल.- भूषण दलाल, अध्यक्ष, हेल्पिंग हँड सामाजिक संस्था.

बातम्या आणखी आहेत...